Tuesday, October 6, 2026

NMIA Bus Service: आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळासाठी ST बससेवेची सुरूवात, कशी असेल सुविधा?

New Mumbai International Airport Bus Service: मुंबईसह बोरिवली आणि पुण्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारतर्फे एसटी बससेवा सुरू केली जाणार आहे.

मुंबई: नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारतर्फे एसटी बससेवा सुरू केली जाणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते विमानतळ बससेवेचा प्रारंभ होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांना तिकिटापेक्षा जास्त ट्रान्सपोर्टसाठीच पैसा खर्च करावा लागतो. अनेक कॅब ड्राईव्हर प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारतात, त्यामुळे अनेकदा प्रवाशांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी केली जात होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी एसटी मंडळाकडून दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा सुरू करण्यात येत आहे. ही बससेवा अटल सेतू मार्गे केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ हे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोकणसह राज्यातील विविध भागांसोबत जोडण्यासाठी विमानतळावरून बससेवेचा श्रीगणेशा केला जात आहे. उद्यापासून दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा सुरू होण्यासोबतच बोरिवली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्वारगेट ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी बससेवा सुद्धा लवकरच सुरू होणार आहे.

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी एसटीची विमानतळ बससेवा महत्त्वपूर्ण ठरेल. विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच विमानप्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह , प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

एसटीची ‘लालपरी’ आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. या व्यापक जाळ्याचा उपयोग करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवाशांना सहज आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून टप्प्याटप्प्याने आवश्यक बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दादर हे मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र असल्याने येथून विमानतळासाठी सुरू होणारी थेट बससेवा प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील विविध भागांतून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा करण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विमानतळापर्यंतची अखंड आणि सहज सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी ही आधुनिक वाहतूक व्यवस्थेची खरी ओळख आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एसटीचे व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळे यांचा समन्वय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील महत्त्वाचा दुवा ठरणार असून, प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार विमानतळ बससेवा देण्याचा एसटी महामंडळाचा संकल्प असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >