आयपीएल 2027 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची 'दादागिरी', स्पर्धेपूर्वी घेतला मोठा निर्णय
IPL 2027, Delhi Capitals: आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी सर्वच फ्रेंचायझी आपली रणनिती आखताना दिसत आहेत. असं असताना दिल्ली कॅपिटल्सने एक मोठा फासा टाकला आहे. चला जाणून घेऊयात काय आहे रणनिती ते...
October 6, 2026 03:55 PM
आयपीएल 2027 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची 'दादागिरी', स्पर्धेपूर्वी घेतला मोठा निर्णय (Photo: ANI)
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी आता अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. इतकंच काय तर रिटेन केलेल्या खेळाडू यादी जाहीर करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2026 ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गोव्यात मिनी लिलाव पार पडणार आहे. त्यामुळे खेळाडूंची अदला-बदल करण्यासाठी ट्रेडिंग विंडो खुली असून ती रिटेन्शनच्या अंतिम तारखेच्या एक आठवडा आधी बंद होईल. असं असताना दिल्ली कॅपिटल्सने आपला एक पत्ता ओपन केला आहे. आयपीएल 2027 स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी सौरव गांगुली यांची निवड केली आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे. सौरव गांगुली मुख्य प्रशिक्षक म्हणून हेमांग बदानी यांची जागा घेणार आहेत. मागच्या दोन पर्वात हेमांग बदानी यांनी प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली होती. पण त्याच्या मार्गदर्शनात अपेक्षित यश मिळालं नाही, त्यामुळे आता त्यांच्या जागी सौरव गांगुली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सौरव गांगुली आणि दिल्ली कॅपिटल्सचं नातं
सौरव गांगुली आणि दिल्ली कॅपिटल्स हे समीकरण 2019 पासून जुळून आलं आहे. या फ्रेंचायझीच्या सल्लागारपदी ते होते. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पुरूष आणि महिला या दोन्ही संघाच्या क्रिकेट संचालकपदी त्यांची नियुक्ती केली. गांगुली यांनी यावर्षी एसए20 लीगमध्ये दिल्ली फ्रँचायझीच्या प्रिटोरिया कॅपिटल्स संघाचं मुख्य प्रशिक्षकपद भूषवलं होतं. णि त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण पराभवाचं तोंड पाहावं लागलं. सनरायझर्स इस्टर्न केपने केपटाऊन येथे झालेल्या अंतिम सामन्यात प्रिटोरिया कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने या कामगिरीनंतर त्यांच्यावर आणखी जबाबदारी टाकली आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षपदी विराजमान झाल्यानंतर सौरव गांगुलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सौरव गांगुली म्हणाला की, "दिल्ली कॅपिटल्स माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझे फ्रेंचायझीशी एक घट्ट नाते आहे. मी फ्रँचायझीचे मालक, व्यवस्थापन, सपोर्ट स्टाफ आणि खेळाडू यांच्यासोबत जवळून काम केले आहे. ही नवीन भूमिका माझ्यासाठी खूप रोमांचक असेल. दिल्लीकडे एक प्रतिभावान संघ आहे जो काही काळापासून उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे. मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे." दिल्ली कॅपिटल्स संघाला अद्याप एकही जेतेपद मिळवता आलेलं नाही. 2020 मध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र पराभवाचं तोंड पाहावं लागलं. 2021पासून तर प्लेऑफही गाठली नाही. त्यामुळे सौरव गांगुलीकडून मोठी अपेक्षा असणार आहे.