Friday, October 9, 2026

'सायबरटेक एशिया'चे पहिल्यांदाच भारतात आयोजन; जागतिक सायबर सुरक्षा परिषद कधी, कुठे असेल?

Global Cybersecurity Summit: सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या ‘सायबरटेक एशिया’चे मार्च २०२७ मध्ये मुंबईत आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबई: सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या ‘सायबरटेक एशिया’चे मार्च 2027 मध्ये मुंबईत आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून या जागतिक उपक्रमाचे भारतात प्रथमच आगमन होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सायबरटेक ग्लोबलचे संस्थापक आणि ‘सायबरमॅनिया’ या पुस्तकाचे लेखक अमीर रापापोर्ट तसेच इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्य सरकारचा ‘महासायबर’ उपक्रम, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्य यांवर चर्चा झाली.

राज्यात वाढत्या डिजिटल धोक्यांना आणि ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी ‘महासायबर’ ही राज्य सरकारची महत्त्वाची यंत्रणा आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास करणे, अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे आणि डिजिटल धोक्यांचा मुकाबला करणे, ही या यंत्रणेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावरील अनुभवांचा राज्याला उपयोग करून घेता यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यावरही या बैठकीत भर देण्यात आला.

जानेवारी 2027 मध्ये तेल अवीव येथे होणाऱ्या ‘सायबरटेक ग्लोबल’ कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण रापापोर्ट आणि रेवाच यांनी दिल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. तसेच, सायबरटेक एशियाचे मुंबईत आयोजन करण्यासाठी त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास महाराष्ट्र उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सायबरटेक ग्लोबल हे सायबर सुरक्षा आणि डिजिटल नवकल्पनांवर केंद्रित असलेले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद व्यासपीठ आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ, संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील घटकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने या व्यासपीठाला महत्त्व आहे. मुंबईत होणाऱ्या या आयोजनामुळे सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील जागतिक घडामोडी आणि सहकार्याच्या संधी निर्माण होणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा