Friday, October 9, 2026

Vidhan Parishad Election : वरिष्ठांच्या शिष्टाईनंतरही अनेक मतदारसंघांत बंडखोरी कायम; विधान परिषदेच्या पाच जागांसाठी लढती निश्चित

पुण्यात वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर महायुतीतील मंगेश चिवटे आणि भैय्या माने यांनी माघार घेतली; मात्र पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांत काही उमेदवारांनी माघार न घेतल्याने अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान कायम आहे. त्यामुळे पाचही मतदारसंघांतील लढतींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील बंडखोरीला अंशतः लगाम, नागपूर आणि अमरावतीतही मुख्य उमेदवारांसमोर आव्हान

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरी पूर्णपणे शमलेली नाही. पुण्यात वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर महायुतीतील मंगेश चिवटे आणि भैय्या माने यांनी माघार घेतली; मात्र पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांत काही उमेदवारांनी माघार न घेतल्याने अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान कायम आहे. त्यामुळे पाचही मतदारसंघांतील लढतींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. महायुतीत शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निर्माण झालेला पेच वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर सुटला. चिवटे यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानंतर माघार घेतली. मात्र, सचिन सानप यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने गावडे यांच्यासमोरील आव्हान कायम आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्या माने यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ तसेच महायुतीतील अन्य नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी माघार घेतली. महायुतीतील मतभेद दूर करण्याच्या दृष्टीने ही माघार महत्त्वाची ठरली असली, तरी माजी आमदार दत्ता सावंत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघातील लढत बहुरंगी होणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात प्रमुख सामना होणार आहे. भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर आव्हान उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नितेश कराळे हेही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.

अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या अदिती पोहरे आणि शिवसेनेच्या किरण सरनाईक यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. तर उबाठा गटाचे दत्तात्रय लहाने यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने लढतीत तिसरा पर्याय निर्माण झाला आहे. याशिवाय शिंदे गटाचे माजी आमदार श्रीकांत शिंदे आणि भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे शेखर भोयर यांनीही बंडखोरी करत अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघातील राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.

मतांच्या विभागणीवर काय परिणाम होणार?

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सतीश चव्हाण आणि उबाठा गटाचे दिलीप घुगे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी वरिष्ठ नेत्यांनी बंडखोरांची मनधरणी करून काही ठिकाणी माघारी घडवून आणल्या. मात्र, सर्वच मतदारसंघांतील नाराजी दूर करण्यात पक्षनेतृत्वाला यश आलेले नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवारांसाठी पक्षांतर्गत आव्हान कायम असून, बंडखोरांच्या भूमिकेचा निवडणूक प्रचारावर आणि मतांच्या विभागणीवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >