Thursday, October 22, 2026

Reliance Industries : मार्को रूबियो आणि सर्जियो गोर यांची जामनगर रिफायनरीला भेट; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीवर चर्चा

या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने अत्याधुनिक रिफायनरी, नवीन ऊर्जा गिगाफॅक्टरी आणि निर्माणाधीन डेटा सेंटरची पाहणी केली.

Business News: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिफायनरी प्रकल्पाला भेट दिली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी अमेरिकन शिष्टमंडळाचे स्वागत केले. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने अत्याधुनिक रिफायनरी, नवीन ऊर्जा गिगाफॅक्टरी आणि निर्माणाधीन डेटा सेंटरची पाहणी केली.

जामनगरला जागतिक स्तरावरील नवोन्मेष आणि उत्पादनाचे केंद्र बनवण्याची कंपनीची दूरदृष्टी अंबानी कुटुंबीयांनी शिष्टमंडळासमोर मांडली. या भेटीत पारंपरिक तेल शुद्धीकरणासोबतच नवीन ऊर्जा क्षेत्रातील संधी, तंत्रज्ञान आणि भविष्यातील गुंतवणुकीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

ऊर्जा आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर भर

या चर्चेत किफायतशीर ऊर्जेचा पुरवठा, जागतिक पुरवठा साखळी अधिक मजबूत करणे आणि भविष्यातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता यावर भर देण्यात आला. ऊर्जा क्षेत्र आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधील वाढत्या समन्वयावरही चर्चा झाली.

आधुनिक डेटा सेंटर चालवण्यासाठी अखंड आणि विश्वासार्ह वीजपुरवठा आवश्यक आहे. त्याचबरोबर डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी स्वच्छ ऊर्जेचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांत अमेरिकन कंपन्यांसोबत सहकार्याच्या शक्यतांवरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

भारत-अमेरिका व्यापार संबंधांच्या पार्श्वभूमीवर भेट

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असताना या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणि गुंतवणुकीच्या संधी या दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

रशियन कच्च्या तेलाच्या आयातीशी संबंधित अमेरिकेच्या शुल्क धोरणाचाही या पार्श्वभूमीवर उल्लेख केला जात आहे. भारतासाठी ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणणे महत्त्वाचे असले, तरी मोठ्या प्रमाणावर तेलपुरवठादार बदलणे सहज शक्य नसते. त्यामुळे ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळी यांबाबत दोन्ही देशांमधील चर्चा महत्त्वाची ठरते.

जामनगरमधील या भेटीमुळे पारंपरिक ऊर्जा क्षेत्रासोबतच नवीन ऊर्जा, डेटा सेंटर आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांत भारत-अमेरिका सहकार्याच्या संभाव्य संधी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >