Nashik Kumbh Mela : ध्वजारोहण सोहळ्यात होणार अधिकृत कुंभ संकेतस्थळाचे अनावरण

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा भाग म्हणून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. भाविकांना कुंभमेळ्याशी संबंधित अधिकृत व विश्वासार्ह माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, तसेच यात्रेचे नियोजन अधिक सुलभ करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.


ध्वजारोहण सोहळ्यावेळी या संकेतस्थळाच्या प्राथमिक आवृत्तीचे अनावरण करण्यात येणार आहे. सुरुवातीला कुंभमेळ्याची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारे हे संकेतस्थळ पुढील टप्प्यांत अधिक सक्षम करण्यात येईल. त्यामध्ये थेट अद्ययावत माहिती, विविध डिजिटल सुविधा आणि संबंधित यंत्रणांच्या प्रणालींशी समन्वय साधणाऱ्या सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.



कुंभयात्रेच्या नियोजनासाठी एकच व्यासपीठ


संकेतस्थळावर कुंभमेळ्याचा इतिहास, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा, महत्त्वाची मंदिरे, घाट, आखाडे आणि धार्मिक स्थळांची माहिती उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा, सूचना आणि भाविकांसाठी आवश्यक मार्गदर्शनही या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे, रस्ते आणि स्थानिक वाहतुकीसंबंधी माहिती एकाच ठिकाणी देण्याचे नियोजन आहे. पुढील टप्प्यांत वाहनतळ, वाहतुकीतील बदल, प्रवेश व निर्गमन मार्ग, शटल सेवा, पायी जाण्याचे मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक पर्यायांची माहितीही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.



मूलभूत सुविधांची माहिती मिळणार


भाविकांना आवश्यक सुविधा शोधणे सोपे व्हावे, यासाठी संकेतस्थळावर विविध सेवांची स्वतंत्र निर्देशिका प्रस्तावित आहे. यामध्ये स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्नान सुविधा, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णालये, पोलिस चौक्या, मदत कक्ष, हरवले-सापडले केंद्रे, निवास व्यवस्था, अन्नसेवा, वाहनतळ, बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांची माहिती समाविष्ट असेल. संकेतस्थळाच्या पुढील आवृत्तीत शोध सुविधा आणि नकाशाच्या माध्यमातून या ठिकाणांची माहिती मिळवता येईल, अशी व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे.



सुरक्षा आणि आपत्कालीन मदतीवर भर


कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना वेळेवर आणि अधिकृत माहिती मिळावी, यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र सुरक्षा व आपत्कालीन मदत विभाग प्रस्तावित आहे. पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, नियंत्रण कक्ष आणि अन्य हेल्पलाइन क्रमांकांसह सार्वजनिक आरोग्यविषयक सूचना, गर्दी व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन आणि प्रतिबंधित वस्तूंची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात येईल. संबंधित यंत्रणांकडून माहिती उपलब्ध होऊन आवश्यक डिजिटल प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर वाहतुकीतील बदल, हवामानविषयक सूचना, नदीच्या स्थितीबाबतचे इशारे, गर्दीविषयक माहिती आणि अन्य महत्त्वाच्या सूचनाही संकेतस्थळावर अद्ययावत करण्याचे नियोजन आहे.



विविध भाषांमध्ये, मोबाइलवरही सहज उपलब्ध


देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातून येणाऱ्या भाविकांनाही माहिती सहज मिळावी, यासाठी संकेतस्थळ बहुभाषिक स्वरूपात विकसित करण्याचे नियोजन आहे. संगणक आणि मोबाइलवर सहज वापरता येण्यासोबतच कमी इंटरनेट वेगातही ते कार्यक्षम राहील, यावर भर देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींसह विविध गरजा असलेल्या वापरकर्त्यांना माहिती सहज मिळावी, यासाठी सुलभतेशी संबंधित सुविधांचाही विचार करण्यात आला आहे. याशिवाय, निवडक घाट, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणांची आभासी सफर, ३६० अंश दृश्ये, ध्वनिमार्गदर्शन, व्हिडिओ आणि अधिकृत थेट प्रक्षेपणाच्या लिंक अशा सुविधांचाही प्रस्ताव आहे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि मदतीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही विकसित करण्यात येणार आहे.



‘कुंभदूत’सह एकात्मिक डिजिटल यंत्रणा


अधिकृत संकेतस्थळ हे कुंभमेळ्यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या व्यापक डिजिटल व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असेल. यामध्ये मोबाइल ॲप्लिकेशन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाविक सहाय्य प्रणाली ‘कुंभदूत’ यांचाही समावेश प्रस्तावित आहे. या विविध माध्यमांद्वारे भाविकांना एकसमान, अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.


संकेतस्थळाच्या सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित होत असताना भाविकांना माहिती मिळवणे, यात्रेचे नियोजन करणे आणि आवश्यक सेवांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू! दारूच्या बाटल्या अन् औषधांमुळे गूढ वाढले

चंदीगड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील ५६ वर्षीय व्यावसायिक दीपक मित्तल हे

Underground Local: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, नोकरदारांना दिलासा; चर्चगेट- विरार भूमिगत रेल्वे मार्गाचा प्रस्ताव?

मुंबई: पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) चर्चगेट (Churchgate) ते विरार (Virar) स्थानकादरम्यान भूमिगत उपनगरीय रेल्वे (Underground Local) नेटवर्क

पूर्व महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना; पायाभूत प्रकल्पांसाठी 6.17 कोटी मेट्रिक टन राखेच्या वापराचा ऐतिहासिक सामंजस्य करार

मुंबई : राज्यातील पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, दोषनिश्चितीवरील सुनावणी 27 तारखेपर्यंत पुढे

Ashok Kharat : स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप

इतकी वर्षे जपलं ते गमावलं..! टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या टी20 कारकिर्दीला डाग

क्राईस्टचर्च येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी20 सामना सुरू आहे. या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये वेगवान

एसटी बसस्थानकं चकाचक ठेवण्याची जबाबदारी विभाग नियंत्रकांचीच; अस्वच्छतेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा

मुंबई: एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना