Saturday, October 24, 2026

Best Player Award : अहिल्यानगरची सुमय्या शेख ठरली वर्षातील सर्वोत्तम खेळाडू

हिल्यानगरची महिला फुटबॉलपटू सुमय्या शेख हिला वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या वतीने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने गौरवण्यात आले. तिच्या यशामुळे महिला फुटबॉलमध्ये अहिल्यानगरचा नावलौकिक उंचावला आहे.

अहिल्यानगर (प्रतिनिधी): येथील प्रतिभावान महिला फुटबॉलपटू सुमय्या शेख हिने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्यावतीने दिला जाणारा २०२५-२६ हंगामातील वरिष्ठ महिला गटाचा ‘वर्षातील सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कार पटकावला आहे. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.सुमय्याने संपूर्ण हंगामात राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केली. तिच्या खेळातील कौशल्य, गोल करण्याची क्षमता आणि संघाच्या यशात दिलेले योगदान यांची दखल घेत तिला या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०२५-२६ च्या हंगामात सुमय्याने लोणावळा येथे झालेल्या महाराष्ट्र वरिष्ठ क्लब राज्य लीग स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी संघाचे प्रतिनिधित्व केले. केरळ येथे झालेल्या इंडियन वुमेन्स लीग २ स्पर्धेत, तसेच बेंगळुरू येथे झालेल्या अंतिम फेरीतही तिने सहभाग नोंदविला. जळगाव येथे झालेल्या आंतरजिल्हा स्पर्धेत अहिल्यानगर संघाने तृतीय स्थान मिळविले, तर सुमय्याने या स्पर्धेत सर्वाधिक गोल करून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरण्याचा मान मिळविला.

आंतरविद्यापीठीय फुटबॉल स्पर्धांमध्येही तिने आपल्या कामगिरीची छाप पाडली. मध्य प्रदेश येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात तिचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यानंतर तामिळनाडू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने उपविजेतेपद पटकावले. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतही सुमय्या सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघात समावेश होण्यापूर्वी सुमय्या हिचे प्रशिक्षण नगरच्या गुलमोहर फुटबॉल क्लब येथे झाले असून, तिच्या यशामध्ये गुलमोहर फुटबॉल क्लब चे मोठे योगदान आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >