मुंबई : महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला देशातील अग्रगण्य राज्यांच्या पंक्तीत आणण्यासाठी विभागाचे बजेट 212 कोटी रुपयांवरून 1 हजार 240 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले असून, 2029 पर्यंत ते पाच हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी दिली. मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, मोठे व्यावसायिक प्रकल्प, मत्स्यबीज निर्मिती, हॅचरी आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक), नाबार्ड आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या वतीने ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत राणे बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मत्स्य व्यवसायासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच मच्छीमारांना कृषी क्षेत्राच्या धर्तीवर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवावीत, ...
महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील मत्स्य उत्पादनातील मोठी तफावत दूर करण्यासाठी आंध्र प्रदेशचा दौरा करून तेथील यशस्वी मत्स्य व्यवसाय मॉडेलचा अभ्यास केल्याचे राणे यांनी नमूद केले. आंध्र प्रदेशचे वार्षिक मत्स्य उत्पादन सुमारे 55.39 लाख टन असून, महाराष्ट्राचे उत्पादन सुमारे 7.35 लाख टन आहे. हे अंतर कमी करून राज्यातील मत्स्य व्यवसायाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला-उभादांडा येथे बहुप्रजाती मत्स्यबीज केंद्र उभारण्यात येत असून, पुढील 12 महिन्यांत ते कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. मत्स्यबीज निर्मिती, हॅचरी आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार करण्याची मोठी संधी आहे. त्यासाठी मच्छीमारांनी आधुनिक प्रकल्प उभारावेत आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहन राणे यांनी केले.
सरकार, सहकारी बँका आणि नाबार्ड मच्छीमारांच्या पाठीशी आहेत. उपलब्ध आर्थिक पाठबळाचा लाभ घेऊन मच्छीमारांनी व्यवसायवाढीसाठी पुढाकार घ्यावा. राज्यातील मच्छीमार आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध व्हावेत, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेला एमएससी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, मुख्य महाव्यवस्थापक अशोक माने, नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर, जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश तिवारी, सहायक महाव्यवस्थापक पियुष, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांच्यासह बँकिंग आणि सहकार क्षेत्रातील अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.