Eknath Shinde : 'शेतकऱ्याला छळाल तर तुरुंगात पाठवू’; बँका, पतसंस्था, विमा कंपन्या, मायक्रो फायनान्स आणि सावकारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवरून एकनाथ शिंदे आक्रमक; ‘शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कठोर कारवाई’

नाशिक : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या बँका, पतसंस्था, विमा कंपन्या, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. शेतकऱ्यांवर दबाव आणून त्यांना टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल आणि दुष्काळग्रस्त हरसूल परिसरात शिवसेनेच्या वतीने १० हजार आदिवासी कुटुंबांना दिवाळीनिमित्त शिधावाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. संकटाच्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे हीच शिवसेनेची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



‘शेतकऱ्यांवर दबाव आणल्यास कारवाई’


दुष्काळामुळे उभी पिके करपली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे लागणे सहन केले जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्यामागे दबाव आणणाऱ्यांची भूमिका तपासली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी निराश होऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या अडचणी शिवसेनेचे कार्यकर्ते, प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.



राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त


राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचा उल्लेख करत पात्र शेतकऱ्यांना दुष्काळातील सवलती आणि लाभ देण्यात येतील, असे शिंदे यांनी सांगितले. तातडीची पाच हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. दुष्काळाच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



प्रत्येक दुष्काळग्रस्त भागात ‘शेतकरी मदत कक्ष’


दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रत्येक भागात ‘शेतकरी मदत कक्ष’ सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी शिवसैनिकांना दिले. पीक नुकसानीचे पंचनामे, अर्ज, नुकसानभरपाई, पाणीपुरवठा, टँकर आणि शासकीय योजनांचे लाभ वेळेत मिळत आहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. “आता दुसरे काम नको; बांधावर, शेतावर आणि शेतकऱ्यांच्या घरी जा,” असे सांगत त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी होण्यावर भर दिला.



शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा उल्लेख


शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतील सहा हजार रुपयांसोबत राज्य सरकारकडून सहा हजार रुपये देऊन वार्षिक मदत १२ हजार रुपये करण्यात आल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची तरतूद, एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, नैसर्गिक आपत्तीतील मदतीत वाढ, दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई आणि सततचा पाऊस तसेच गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत अशा निर्णयांची माहिती त्यांनी दिली.



दुष्काळग्रस्तांसाठी पाणी, चारा आणि विवाहासाठी मदत


दुष्काळ दीर्घकाळ टिकण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी, चारा आणि अन्नधान्याचे नियोजन करण्याची गरज शिंदे यांनी व्यक्त केली. छोटे-मोठे जलप्रकल्प, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि गरजू गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळामुळे आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या विवाहांसाठी शिवसेनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. ग्रामीण भागातील मुलींसाठी २५ हजार सायकलींच्या वाटपाचा उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.



‘जिथे संकट, तिथे शिवसेना’


मागील वर्षी अतिवृष्टीमुळे जमिनीचे नुकसान, गुरे वाहून जाणे आणि घरांची पडझड अशा संकटांचा सामना नागरिकांना करावा लागला होता. त्यावेळी सरकारकडून मदत करण्यात आल्याचे सांगत यंदा दुष्काळामुळे नागरिकांची दिवाळी अडचणीत जाऊ नये, यासाठी शिधावाटप करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “जिथे संकट, तिथे शिवसेना” या भूमिकेतून पूर, महापूर किंवा दुष्काळ अशा कोणत्याही संकटात शिवसैनिकांनी नागरिकांच्या मदतीला धावून जावे, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनुसार समाजकारणाला प्राधान्य देत १०० टक्के समाजकारण प्रत्यक्षात आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. वाहने पोहोचू शकत नसलेल्या दुर्गम गावांमध्येही मदत पोहोचवावी आणि पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे शिंदे यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री दादाजी भुसे, नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे, माजी आमदार निर्मला गावित, धनराज महाले, बाळासाहेब लांबे, अनिल डिकले, सदा नवले, रवींद्र भोळे, नैना गावित यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत वेळेत द्या; ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी-चाऱ्याचे नियोजन करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या

महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे बजेट ५ हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य - मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला देशातील अग्रगण्य राज्यांच्या पंक्तीत आणण्यासाठी विभागाचे बजेट 212 कोटी

Devendra Fadnavis : 'महा कॅम्पा' निधीतून व्याघ्र प्रकल्पांतील गावांचे पुनर्वसन पूर्ण करा ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : व्याघ्र प्रकल्प आणि अन्य संरक्षित वनक्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची कामे महाराष्ट्र पर्यायी वनीकरण

राज्यातील दोन राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्रास वन्यजीव

नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या जमिनीच्या हस्तांतरणावरील २५ टक्के शुल्क माफ - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुंबई : राज्यातील सौर आणि पवन ऊर्जेसारख्या नवीन ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी जमिनीच्या अंतर्गत

दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांत जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर, प्रत्येक गावात 100 जलशोषक खड्डे खोदणार

मुंबई: अपुऱ्या पावसामुळे 2026 च्या खरीप हंगामात ‘ट्रिगर-1’ आणि ‘ट्रिगर-2’ लागू झालेल्या 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ