Thursday, October 29, 2026

राष्ट्रवादीत नाराजीचा सूर? झिशान सिद्दीकींच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर सिद्धार्थ कांबळेंचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र देऊन जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कांबळे नाराज असल्याची चर्चा आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबईतील संघटनात्मक नियुक्तीवरून नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती झाल्यानंतर कांबळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सादर केला आहे.

राजीनामा पत्रात काय म्हटलंय?

सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या राजीनामा पत्रात मुंबई कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आणि सहकार्याबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. तसेच, यापुढेही पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ राहून पक्षाच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांना पत्र

कांबळे यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही राजीनामा पत्र दिले आहे. दोन्ही पत्रांमध्ये त्यांनी मुंबई कार्याध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारून पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरच कांबळे यांनी राजीनामा दिल्याने या निर्णयामागे संघटनात्मक नाराजी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, राजीनामा पत्रात त्यांनी नाराजीचे कारण स्पष्ट केलेले नाही. पक्षश्रेष्ठी या राजीनाम्याबाबत काय भूमिका घेतात आणि कांबळे यांचा राजीनामा स्वीकारला जातो का, याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >