Friday, October 30, 2026

Railway News: ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबईसह 8 शहरांमध्ये रेल्वेकडून थेट पार्सल घरपोच; स्टेशनवर जाण्याची कटकट गेली

Indian Railways Plans Doorstep Parcel Pickup & Delivery Service: भारतीय रेल्वेकडून आता कुरिअर कंपन्यांप्रमाणे ग्राहकांच्या घरून पार्सल आणण्याचे आणि पार्सल नेण्याचे काम केले जाणार आहे.

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने आता नागरिकांच्या सेवेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेकडून आता कुरिअर कंपन्यांप्रमाणे ग्राहकांच्या घरून पार्सल आणण्याचे आणि पार्सल नेण्याचे काम केले जाणार आहे. पार्सल पिकअपच्या पत्त्यावरून ते घेऊन जाऊन पार्सल ज्या पत्त्यावर न्यायचे आहे, त्या पत्त्यावर नेऊन देण्याचे काम करणार आहे. ग्राहक रेल्वेच्या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट करू शकणार आहेत. ही कुरिअर सेवा इतरत्र कुरिअर कंपन्यांपेक्षा लक्षणीयरीत्या स्वस्त असेल. याचा फायदा लहान व्यवसायांना आणि ऑनलाइन खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. ग्राहकांना त्यांचं सामान पिकअप करण्यासाठी आणि ड्रॉप करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जावे लागणार नाही. रेल्वे तुमचे पार्सल तुमच्या घरातून उचलून वेळेवर पोहोचवेल.

दिल्ली-मुंबईसह आठ शहरांमध्ये पार्सल सेवा

पार्सल सेवा योजनेचा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाला आहे. आता, दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील आठ शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळूर आणि पुणे या शहरांचा पार्सल सेवा योजनेच्या यादीत समावेश आहे. यासाठी रेल्वेने 'घर से घर तक' नावाचे रेल पार्सल ॲप विकसित केले आहे. ही सेवा कुरिअर कंपन्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे. ह्या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना थेट कंपनीसोबत जोडले जाणार आहे. ग्राहक या ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट करू शकतील. यामुळे ग्राहकांना रेल्वे स्टेशनवर पार्सल नेण्याचा- आणण्याचा किंवा जुन्या पद्धतीने अर्ज भरण्याचा त्रास दूर होणार आहे.

रेल्वेने पार्सल कसे पाठवायचे

या रेल्वे पार्सल सेवेअंतर्गत, कंपन्या प्रथम ग्राहकाच्या घरातून माल घेऊन बुकिंग स्टेशनवर पोहोचवतात. तिथून, ते पार्सल रेल्वे ट्रेनद्वारे तो गंतव्य स्टेशनपर्यंत पोहोचवते. त्या स्टेशनवर, दुसरी कुरियर कंपनी ते पार्सल निश्चित केलेल्या पत्त्यावर पोहोचवते. उदाहरणार्थ, जर तुम्ही मुंबई ते पुणेसाठी पार्सल बुक केले असेल, तर कंपनी तुमचे पार्सल तुमच्या घरातून घेऊन मुंबई रेल्वे स्टेशनवर आणेल. तिथून, तो माल ट्रेनने पुणे स्थानकावर पोहोचवला जाईल. तिथून, कंपनी पुण्यातील निश्चित केलेल्या पत्त्यावर माल पोहोचवेल. लॉजिस्टिक्स कंपनी ग्राहकासाठी मालाचे पॅकेजिंग आणि इतर आवश्यक हाताळणीची देखील काळजी घेईल.

पार्सलची बुकिंग 15 दिवस आधी करणे आवश्यक आहे. ट्रेन सुटण्याच्या 15 दिवस आधी बुकिंग प्रोसेस सुरू होईल. ग्राहक ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधीपर्यंत बुकिंग करू शकतात. लॉजिस्टिक्स कंपनीने ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे पार्सल सुपूर्द करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >