Monday, November 2, 2026

Nashik : नाशिकच्या मुख्य बाजारपेठेत 3 ते 11 नोव्हेंबरपर्यंत वाहतूक बदल, 7 मार्गांवर प्रवेश बंद

Nashik : दिवाळी सणाचे खरेदी-विक्री निमित्ताने नाशिक शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ भागात मोठ्या प्रमाणात नागरिक व त्यांच्या वाहनांची गर्दी होत असते. त्यामुळे ३ नोव्हेंबर २०२६ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुख्य बाजारपेठेतील मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना नाशिक शहराचे पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित केली आहे. सरकारवाडा व भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती बाजारपेठा मेनरोड, रविवार कारंजा, शालीमार, सांगली बँक परिसरामध्ये दिवाळी खरेदी-विक्रीसाठी नागरिक, व्यावसायिक व त्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात येत असून सदरचे ७ मार्ग ‘वाहनविरहित’ करण्यात येत आहेत.

प्रवेश बंद मार्ग

मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजा कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेश बंद.

दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर, भद्रकाली कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

नेपाळी कॉर्नर – गा.म. पुतळा – मेनरोड – धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

पर्यायी मार्ग

मालेगाव स्टॅण्ड – मखमलाबाद नाका – रामवाडी – बायजाबाई छावणी – चोपडा लॉज – गंगापूर नाका या मार्गे इतर वाहने जातील व येतील.

पंचवटीकडून मेन मार्केटकडे येणारी वाहने संतोष टी पॉईंट, द्वारका मार्गे इतरत्र जातील व येतील.

जुने नाशिक परिसरात जाण्या-येण्यासाठी सीबीएस – शालीमार – खडकाळी सिग्नल – सारडा सर्कल या मार्गाचा वापर करावा.

वाहनचालकांनी गर्दीची ठिकाणे सोडून इतर तत्सम पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.

वर नमूद मार्गांत व वेळेत परिस्थितीनुसार ऐनवेळी कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत.

पार्किंग व्यवस्था

बी.डी. भालेकर मैदान,शालीमार

रविवार कारंजा

गोदाघाट तसेच गाडगे महाराज पुलाखाली

स्मार्ट सिटीच्या मार्किंग केलेल्या पार्किंगमध्ये

खरेदीसाठी मुख्य बाजारपेठांमध्ये येणारे वाहनचालकांनी आपली वाहने वर नमूद पार्किंगचे ठिकाणी पार्क करावीत.

वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेकरीता असलेली वाहने, अग्निशमन दलाची वाहने, शववाहिका, रुग्णवाहिका, तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागू राहणार नाहीत. सदर अधिसूचना ३ नोव्हेंबर २०२६ पासून अंमलात येणार असून ३ ते ११ नोव्हेंबर २०२६ पावेतो प्रत्येक दिवशी सकाळी १० ते रात्री १० पावेतो ९ दिवस अंमलात राहील. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >