Friday, November 13, 2026

Kho-Kho Championship: ४० वर्षांनंतर नगरमध्ये रंगणार राज्य खो-खो स्पर्धेचा थरार; २८ नोव्हेंबरपासून ४८ संघांमध्ये चुरस!

Ahilyanagar Kho-Kho Championship: तब्बल चार दशकांनंतर अहिल्यानगर शहरात होत असणाऱ्या पुरुष व महिला गटातील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : तब्बल चार दशकांनंतर अहिल्यानगर शहराला पुन्हा एकदा पुरुष व महिला गटातील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य क्रीडा मंडळ, निर्मलनगर यांच्या वतीने 62 वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2026 या कालावधीत न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धा समितीचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली.(KhoKho)

सन 1986 मध्ये सहकार क्रीडा मंडळाच्या वतीने पुरुष व महिला गटातील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे 40 वर्षांनी पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजन नगरमध्ये होत आहे. या स्पर्धेत राज्यातील पुरुषांचे 24 आणि महिलांचे 24 असे एकूण 48 संघ सहभागी होणार असून, सुमारे 720 खेळाडूंसह प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, पंच, तांत्रिक समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र खो-खो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेसाठी चार स्वतंत्र मैदाने तयार करण्यात येणार असून, दिवसा आणि रात्री विद्युत रोषणाईत सामने खेळविण्यात येतील. प्रेक्षकांसाठी तीन ते चार हजार आसनक्षमतेची गॅलरी उभारण्यात येणार आहे. सहभागी खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून, चारही दिवस जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्पर्धेतील सामन्यांचे आकाशवाणी, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.(Ahilyanagar)

स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून देण्याकामी रामचंद्र दरे, विवेक भापकर, ॲड. विश्वासराव आठरे पाटील आणि जयंत वाघ यांनी सहकार्य केले आहे. पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, डॉ. सुजय विखे पाटील, नगरसेवक निखिल वारे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे आणि महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार संग्राम जगताप, डॉ. सुजय विखे पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष सी.ए. अशोक पितळे, सचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव आणि जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष ॲड. विश्वासराव आठरे पाटील उपस्थित राहणार आहेत. समारोप व पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

अहमदनगर जिल्हा खो-खो संघटनेची स्थापना 1972 मध्ये कै. पी.के. रत्नपारखी, दिनुभाऊ कुलकर्णी, व्ही.ए. निवसरकर, एम.व्ही. बर्डे आणि बी.आर. मोरे यांनी केली. त्यानंतर डॉ. विलास कवळे, अशोक पितळे आणि निर्मलचंद्र थोरात यांनी संघटनेचे कामकाज पाहिले. सध्या ॲड. विश्वासराव आठरे पाटील, विकास परदेशी आणि गौरव पितळे हे संघटनेची जबाबदारी सांभाळत आहेत.(StateKhoKhoChampionship)

यावेळी ॲड विश्वासराव आठरे, प्रा सुनील जाधव, सुमतीलाल कोठारी, गौरव पितळे यांसह खेळाडू उपस्थित होते. यावेळी स्पर्धेच्या बोधचिन्हाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >