मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या प्रवासी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये तब्बल ४० प्रवासी प्रवास करत होते. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळीच बसमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस दिल्लीहून मध्य प्रदेशच्या दिशेने जात होती. रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मथुरा जिल्ह्यातील राया पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना एक्सप्रेसवेवरील ११० व्या मैलाच्या दगडाजवळ बसमध्ये अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४० प्रवाशांचे प्राण वाचले
प्रवासादरम्यान बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तातडीने बस थांबवली. त्यानंतर प्रसंगावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यास मदत केली. काही वेळातच आगीने बसला मोठ्या प्रमाणात वेढले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले असले तरी सर्व ४० प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.
बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळाची शक्यता; उत्तरेकडून थंड वारे! महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट की कडाक्याची थंडी?
मुंबई : राज्यात एकीकडे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची चाहूल लागत असतानाच, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात नव्या हवामान प्रणालीची निर्मिती ...
महिनाभरापूर्वीही धावत्या बसला लागली होती आग
दरम्यान, अशाच प्रकारची घटना ६ ऑक्टोबर रोजी ग्रेटर नोएडा-नोएडा एक्सप्रेसवेवर घडली होती. नोएडाहून आग्र्याकडे जाणाऱ्या एका भरधाव स्लीपर बसला अचानक आग लागली होती. काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली होती. ग्रेटर नोएडातील नॉलेज पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. मात्र, वेळीच प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
सप्टेंबरमध्ये बसला आग लागून ९ प्रवाशांचा मृत्यू
यमुना एक्सप्रेसवेवर २४ सप्टेंबर रोजी घडलेल्या भीषण बस दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला होता. धावत्या स्लीपर बसला अचानक आग लागल्याने या दुर्घटनेत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. आग लागल्यानंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला होता. अनेक प्रवाशांनी बसमधून उड्या मारून आपला जीव वाचवला होता. या प्रकरणी पोलिसांनी बसचा चालक आणि कंडक्टर यांना ताब्यात घेतले होते.
तसेच, २६ सप्टेंबर रोजी ग्रेटर नोएडा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका खासगी बसलाही अचानक आग लागली होती. त्यावेळी बसमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली होती. मात्र, आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.सलग घडणाऱ्या बस आगीच्या घटनांमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मथुरा येथील घटनेत चालकाच्या सतर्कतेमुळे ४० प्रवाशांचे प्राण वाचले असले, तरी वाहनांची नियमित तपासणी आणि अग्निसुरक्षा व्यवस्था किती महत्त्वाची आहे, हे या घटनांनी अधोरेखित केले आहे.