
TRAI : दिवसभर मोबाईलवर येणारे अनावश्यक कॉल आणि प्रमोशनल मेसेज यामुळे तुम्हीही त्रस्त आहात का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI ने स्पॅम कॉल आणि मेसेजविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या टेलिकॉम नंबरवर मोठी कारवाई करत तब्बल 1.24 लाखांहून अधिक नंबर बंद करण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर 374 कंपन्यांना एका वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्या आणि टेलिमार्केटर्सच्या अडचणी वाढल्या आहेत.
1.24 लाखांहून अधिक टेलिकॉम नंबरवर कारवाई
TRAI च्या आर्थिक वर्ष 2026-27 मधील दुसऱ्या तिमाहीच्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत स्पॅम कॉल आणि मेसेजसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1,10,325 मोबाईल नंबरची आउटगोइंग सेवा 15 दिवसांसाठी बंद करण्यात आली.
तर वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13,777 नंबरचे कनेक्शन एक वर्षासाठी बंद करण्यात आले.याशिवाय 3,725 SMS हेडर्स ब्लॉक करण्यात आले असून, 374 कंपन्यांना वर्षभरासाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. या कंपन्यांना या कालावधीत नवीन टेलिकॉम नंबर किंवा इतर संबंधित सुविधा मिळवण्यावरही निर्बंध असतील.
स्पॅम कॉल आणि मेसेजविरोधात 15.29 लाख तक्रारी
TRAI च्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर 2026 या तीन महिन्यांत अनावश्यक व्यावसायिक कॉल आणि मेसेजसंदर्भात एकूण 15.29 लाख तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी 7.23 लाख तक्रारी कारवाईसाठी पात्र ठरल्या. विशेष म्हणजे, स्पॅम कॉल आणि मेसेजची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांकडून TRAI DND App चा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. एकूण तक्रारींपैकी 14.21 लाख तक्रारी या DND अॅपद्वारे नोंदवण्यात आल्या. म्हणजेच जवळपास 92.9 टक्के तक्रारी अॅपच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. सप्टेंबर 2026 पर्यंत या अॅपच्या वापरकर्त्यांची संख्या 42.36 लाखांवर पोहोचली होती.
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने स्पॅम कॉलवर नजर
स्पॅम कॉल आणि मेसेज रोखण्यासाठी दूरसंचार कंपन्यांकडूनही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या AI आधारित यंत्रणांनी संबंधित तिमाहीत तब्बल 19.9 अब्ज कॉल आणि SMS संशयास्पद स्पॅम म्हणून ओळखले. यामध्ये 18.28 अब्ज कॉल आणि 1.62 अब्ज SMS यांचा समावेश आहे. याशिवाय संशयास्पद स्पॅम पाठवणाऱ्या संस्था आणि टेलिमार्केटर्सना 45.9 लाखांहून अधिक चेतावणी नोटिफिकेशन्स पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्पॅमविरोधातील कारवाईत AI तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ChatGPT Wallet Launch : ऑनलाइन शॉपिंग करताना बँक ऑफर्स, डिस्काउंट आणि वेगवेगळ्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरील किमती तपासण्यासाठी अनेक वेबसाइट्सना भेट द्यावी लागते का? ...
प्रमोशनल आणि महत्त्वाच्या कॉलसाठी वेगवेगळे नंबर
नागरिकांना प्रमोशनल कॉल आणि महत्त्वाच्या सेवा-संबंधित कॉलमधील फरक सहज ओळखता यावा, यासाठी TRAI ने वेगवेगळ्या नंबर सीरिज निश्चित केल्या आहेत.
- 140 नंबर सीरिज: प्रमोशनल आणि जाहिरातींसाठी केले जाणारे कॉल . - 1600 नंबर सीरिज: बँकिंग, आर्थिक सेवा, विमा आणि सरकारी सेवांशी संबंधित महत्त्वाचे कॉल.
- 1601 नंबर सीरिज: युटिलिटी, लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरीसारख्या सेवांशी संबंधित कॉलसाठी सुरू करण्यात आलेली सीरिज.
या नंबर सीरिजमुळे नागरिकांना कोणता कॉल जाहिरातीसाठी आहे आणि कोणता महत्त्वाच्या सेवेसाठी आहे, हे ओळखणे सोपे होणार आहे.
कोट्यवधी प्रमोशनल कॉल आणि SMS ब्लॉक
TRAI च्या अहवालानुसार, या तिमाहीत 140 नंबर सीरिजच्या माध्यमातून 15.27 अब्ज प्रमोशनल कॉल करण्यात आले. यापैकी 1.70 अब्ज कॉल नागरिकांच्या DND म्हणजेच Do Not Disturb प्राधान्यांची तपासणी केल्यानंतर ब्लॉक करण्यात आले.तसेच नोंदणीकृत टेलिमार्केटर्सकडून पाठवण्यात येणारे 11.09 अब्ज प्रमोशनल SMS देखील ब्लॉक करण्यात आले आहेत.
स्पॅम कॉल आल्यास काय करावे ?
अनावश्यक प्रमोशनल कॉल किंवा मेसेज येत असल्यास नागरिक TRAI DND अॅपच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात. संशयास्पद कॉल किंवा मेसेजची तक्रार वेळेत केल्यास संबंधित टेलिकॉम कंपन्यांना त्यावर कारवाई करणे सोपे होते.TRAI च्या या कठोर कारवाईमुळे स्पॅम कॉल आणि मेसेजच्या समस्येला आळा बसण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना अनावश्यक कॉल आणि मेसेजपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.





