
ChatGPT Wallet Launch : ऑनलाइन शॉपिंग करताना बँक ऑफर्स, डिस्काउंट आणि वेगवेगळ्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरील किमती तपासण्यासाठी अनेक वेबसाइट्सना भेट द्यावी लागते का? आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तुमची ही अडचण दूर होऊ शकते. OpenAI आपल्या ChatGPT प्लॅटफॉर्मवर AI आधारित शॉपिंग आणि पेमेंट सुविधा आणण्याच्या दिशेने काम करत आहे. या सुविधेला ChatGPT Wallet असे नाव दिले जात आहे.
या फीचरच्या मदतीने AI एजंट तुमच्या आवडीनिवडी आणि बजेटनुसार ऑनलाइन प्रोडक्ट्स शोधू शकतो, वेगवेगळ्या वेबसाइट्सवरील किमतींची तुलना करू शकतो आणि खरेदीची प्रक्रिया सुलभ करू शकतो. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगचा अनुभव अधिक स्मार्ट आणि सोपा होण्याची शक्यता आहे.
काय आहे ChatGPT Wallet फीचर ?
ChatGPT Wallet ही AI आधारित शॉपिंग आणि पेमेंटशी संबंधित सुविधा आहे. या माध्यमातून AI एजंट युजरच्या सूचनेनुसार ऑनलाइन प्रोडक्ट्स शोधणे, त्यांची तुलना करणे आणि खरेदीसाठी आवश्यक माहिती एकत्रित करण्यास मदत करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला ठरावीक बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास ChatGPT वेगवेगळ्या शॉपिंग वेबसाइट्सवरील स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि उपलब्ध ऑफर्सची तुलना करण्यात मदत करू शकतो.
कसे काम करणार ChatGPT Wallet ?
ChatGPT च्या AI एजंटला युजर एखादे प्रोडक्ट शोधण्याची सूचना देऊ शकतो. त्यानंतर AI एजंट विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील प्रोडक्ट्सची माहिती गोळा करून त्यांची तुलना करू शकतो. यानंतर खरेदीसाठी ऑर्डर तयार केली जाऊ शकते. पेमेंट करण्यापूर्वी युजरला प्रोडक्टचे नाव, वेबसाइट, किंमत, एकूण बिल आणि पेमेंटची माहिती दाखवली जाईल. विशेष म्हणजे, युजरची परवानगी मिळाल्यानंतरच पेमेंटची प्रक्रिया पुढे जाईल. त्यामुळे AI एजंटला स्वतःच्या मर्जीने व्यवहार करता येणार नाही.
OpenAI : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे दैनंदिन जीवनापासून ते ऑफिसमधील कामांपर्यंत अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मात्र, याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ...
क्रेडिट कार्डची माहिती राहणार सुरक्षित ?
AI आधारित पेमेंट सुविधेमध्ये सुरक्षिततेला विशेष महत्त्व दिले जाते. यासाठी टोकनायझेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. टोकनायझेशनमध्ये प्रत्यक्ष क्रेडिट कार्ड नंबरऐवजी डिजिटल टोकनच्या माध्यमातून व्यवहार केला जातो. त्यामुळे AI एजंटला कार्ड नंबर आणि CVV यांसारखी संवेदनशील माहिती थेट मिळण्याची गरज राहत नाही. मात्र, युजर्सनी ChatGPT च्या सामान्य चॅटमध्ये क्रेडिट कार्ड नंबर, CVV किंवा बँकिंग OTP यांसारखी गोपनीय माहिती शेअर करणे टाळावे.
चुकीची खरेदी झाल्यास जबाबदार कोण ?
AI एजंटच्या मदतीने ऑनलाइन शॉपिंग करताना ऑर्डरची माहिती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. प्रोडक्टची संख्या, किंमत, डिलिव्हरीचा पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये चूक होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे पेमेंट करण्यापूर्वी ऑर्डरची संपूर्ण माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. प्रोडक्टची विक्री, डिलिव्हरी आणि रिटर्न यांसारख्या बाबींची जबाबदारी संबंधित विक्रेता किंवा मर्चंटच्या धोरणांनुसार असेल.
भारतात ChatGPT Wallet कधी सुरू होणार ?
ChatGPT Wallet भारतात कधी उपलब्ध होणार, याबाबत अधिकृत घोषणा होणे आवश्यक आहे. तसेच भारतीय युजर्ससाठी UPI पेमेंटची सुविधा उपलब्ध होणार का, याबाबतही अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. एकूणच, AI आधारित शॉपिंग सुविधा भविष्यात ऑनलाइन खरेदीचा अनुभव अधिक सोपा आणि स्मार्ट बनवू शकते. मात्र, या फीचरची उपलब्धता, पेमेंट पार्टनर्स आणि सुरक्षिततेशी संबंधित अटी यांची अधिकृत माहिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.






