भोपाळ : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात शनिवारी सकाळी अचानक झालेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. गेल्या 25 दिवसांत जिल्ह्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी ठीक 9.15 वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजण्यात आली. अवघ्या 3 ते 4 सेकंद जमिनीला तीव्र हादरे बसल्याने घरातील सामान हलले आणि नागरिक जीव मुठीत धरून पळत घराबाहेर आले.
सातपुडा भागात भूकंपाचे केंद्र
हवामान व भूकंपशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सातपुडा भागात होते. हे केंद्र खरगोन जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीखाली तब्बल 10 किलोमीटर खोलीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भूकंपाचे धक्के केवळ खरगोनमध्येच नव्हे तर सेंधवा, खंडवा, बुरहानपूर आणि भीकनगाव या सीमावर्ती भागांतही तीव्रतेने जाणवले. विशेष म्हणजे, यापूर्वी 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.14 वाजताही खरगोन जिल्ह्यात 4.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. अवघ्या महिनाभरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, खरगोनमधील या भूकंपानंतर शनिवारी सकाळी 10.29 वाजता लेह-लडाख भागातही 3.9 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.
Jalgaon Earthquake : जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ! रावेरसह अनेक तालुके हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेरसह अनेक तालुक्यांमध्ये शनिवारी सकाळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...
शाळकरी मुलांमध्ये भीती, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
सकाळी अचानक जमिनीला हादरे बसल्याने लोक प्रचंड घाबरले. स्थानिक रहिवासी दीपक कानूनगो, प्रभुराम मालवी आणि बसंत सोनी यांनी सांगितले की, भूकंपाच्या जोरदार झटक्यांमुळे घरातील सोफे आणि फर्निचर आपल्या जागेवरून सरकू लागले. थरकाप उडवणारे हे हादरे जाणवताच नागरिक कुटुंबीयांसह तातडीने रस्त्यावर आले. सनावद रोडवरील अविसन्स शाळेतही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने शिक्षकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ विद्यार्थ्यांना इमारतीतून बाहेर काढून सुरक्षित मोकळ्या मैदानात नेले. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या काळजीचे आणि बचावाचे धडे देण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. खरगोनचे उपविभागीय अधिकारी सत्येंद्र बैरवा यांनी सांगितले की, प्रशासनाने तातडीने विविध भागांतून आढावा घेतला असून सुदैवाने अद्याप कुठेही जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून नागरिकांना पूर्णपणे सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.