Sunday, November 22, 2026

Pune Crime : बारामतीत खंडणी न दिल्याने बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर गोळीबार; 8 तासांत गुन्ह्याचा उलगडा

या प्रकरणातील बंड्या उर्फ अक्षय काळे यालाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Baramati Crime News: पुणे जिल्ह्यातील बारामती एमआयडीसी परिसरात खंडणीच्या मागणीला नकार दिल्याने बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या कारवर गोळीबार केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा बारामती तालुका पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 8 तासांत उलगडा केला आहे. पोलिसांनी दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेली दोन पिस्तुले जप्त केली आहेत. या प्रकरणातील बंड्या उर्फ अक्षय काळे यालाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास शिवशंभो नगर परिसरातील अनन्या व्हिला येथे ही घटना घडली. बांधकाम व्यावसायिक राजन धनंजय कोळेकर (वय 35) यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला.

बंड्या उर्फ अक्षय काळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी कोळेकर यांच्याकडे 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्या कारवर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी 5 तपास पथके तयार केली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून गोळीबारासाठी वापरलेली दोन पिस्तुले जप्त करण्यात आली.

अक्षय काळे यालाही अटक

तपासादरम्यान बंड्या उर्फ अक्षय काळे याचाही या गोळीबारात सहभाग असल्याचे समोर आले. त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 576/2026 नुसार भारतीय न्याय संहिता आणि भारतीय शस्त्र अधिनियमातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करत आहेत. बारामती तालुका पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईमुळे खंडणीसाठी केलेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा अल्पावधीत उलगडा झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >