
Maharashtra News: पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना संस्थात्मक कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्राला ‘पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार 2026’ मध्ये 5 पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये राज्याला दोन पुरस्कार, तर महाराष्ट्रातील तीन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत कर्जवितरणात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मुंबई : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुख्य जलवाहिनीतील गळती दुरुस्त ...
परभणी आणि परळीला कर्जवितरणात प्रथम क्रमांक
नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल आणि केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यात महाराष्ट्राला पीएम स्वनिधी कर्जवितरणातील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रथम क्रमांकाचा, तर डिजिटल व्यवहारांचा अवलंब वाढवण्यासाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गटातही महाराष्ट्रातील शहरांनी उल्लेखनीय कामगिरी केली. एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत परभणी महानगरपालिकेने कर्जवितरणात प्रथम क्रमांक मिळवला. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात परळी नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला. तर दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला.
राज्य आणि स्थानिक संस्थांच्या समन्वयातून यश
राज्य शासन, नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि बँकिंग क्षेत्रातील संस्थांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही कामगिरी साध्य झाल्याचे सांगण्यात आले. या माध्यमातून अधिकाधिक पथविक्रेत्यांपर्यंत संस्थात्मक कर्जसुविधा पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
काय आहे पीएम स्वनिधी योजना?
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी म्हणजेच पीएम स्वनिधी योजना केंद्र सरकारने जून 2020 मध्ये सुरू केली. या योजनेद्वारे पथविक्रेत्यांना कोणत्याही तारणाशिवाय खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सप्टेंबर 2025 मध्ये योजनेची पुनर्रचना करून तिची मुदत मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आली.
योजनेच्या विस्तारित टप्प्यात वाढीव कर्जसुविधा, यूपीआयशी जोडलेले रुपे क्रेडिट कार्ड, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहनपर लाभ आणि ‘स्वनिधी से समृद्धी’ उपक्रमाचा समावेश आहे. या माध्यमातून पथविक्रेत्यांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणे, त्यांची नोंदणी करणे आणि कौशल्य प्रशिक्षण देणे यावरही भर दिला जात आहे.






