Monday, November 23, 2026

Chandrashekhar Bawankule : राज्यात 9 नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरु होणार; नागपूर, गडचिरोलीसह 6 जिल्ह्यांना लाभ

यासंदर्भातील शासन निर्णय 23 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला. 

मुंबई : राज्यातील नागरिकांची महसूलविषयक कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने 9 नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाला अंतिम स्वरूप दिले असून, नागपूर आणि नाशिक विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये ही कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय 23 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला.

कोणत्या जिल्ह्यांत होणार नवीन कार्यालये?

नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यासाठी चिचोली (खापरखेडा) येथे, तर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय सुरू होणार आहे.

नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे कार्यालय सुरू करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर, जामनेर तालुक्यातील पहूर आणि चाळीसगाव येथे तीन कार्यालये सुरू होतील. याशिवाय नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार आणि शहादा येथे, तर धुळे जिल्ह्यात शिरपूर शहरात नवीन अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित केले जाणार आहे.

महसुली कामांसाठी नागरिकांना दिलासा

या कार्यालयांमुळे जमिनीशी संबंधित आणि अन्य महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना तालुक्याच्या मुख्यालयापर्यंत वारंवार जावे लागणार नाही. संबंधित कार्यालयांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील महसूलविषयक अधिकार आणि कामे स्थानिक पातळीवरच पार पाडली जातील. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यास मदत होणार आहे.

मात्र, निवडणुकीशी संबंधित कामे, संजय गांधी निराधार योजना आणि अन्य महसूलविषयक नसलेली कामे मूळ तहसीलदार कार्यालयामार्फतच केली जातील. अशा कामांसाठी नवीन कार्यालयात अर्ज किंवा निवेदने प्राप्त झाल्यास ती पुढील कार्यवाहीसाठी मूळ तहसीलदार कार्यालयाकडे पाठवली जातील.

गतिमान प्रशासनासाठी निर्णय

नवीन अपर तहसीलदार कार्यालयांमुळे नागरिकांना त्यांच्या भागातच महसूलविषयक सेवा उपलब्ध होतील. प्रशासन अधिक गतिमान करण्यासोबतच सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >