Monday, November 23, 2026

दुष्काळी भागात ताकदीने काम करा; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नगराध्यक्षांना निर्देश

शिवसेनेच्या नगराध्यक्षांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जोमाने काम करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या मुलांची दुष्काळामुळे रखडलेली लग्नं शिवसेना पार पाडणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

राज्यातील दुष्काळाची दाहकता पाहता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जोमाने काम करा, असे निर्देश शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षांना दिले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी शिवसेना नगराध्यक्षांची बैठक झाली. यात नगर परिषदेतील विकासकामे, प्रशासनातील अडचणी आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे ६३ नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि हजारो नगरसेवक निवडून आले. हे पक्षाच्या इतिहासातील मोठं यश आहे. आजच्या बैठकीतून नगर परिषदांची वस्तुस्थिती समोर आली. त्यानुसार नगरविकास विभाग सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शासन आपल्या दारीच्या धर्तीवर शिवसेना 'नगराध्यक्ष आपल्या दारी' उपक्रम राबवेल. नगराध्यक्षांनी घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देश शिंदे यांनी दिले. इतर पक्षाच्या नगरसेवकांबाबत मतभेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावं, असंही ते म्हणाले.

दुष्काळी भागात ताकदीने काम करा. बळीराजाला सावरण्यासाठी लाखो हात पुढे आले पाहिजेत. कीर्तनकारांच्या माध्यमातून चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचं समुपदेशन करावं, असं आवाहन शिंदे यांनी केलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची ठरलेली लग्नं दुष्काळामुळे थांबली आहेत. त्या लग्नांची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे, असं शिंदे म्हणाले. युवकांसाठी अभ्यासिका, खेळाची मैदाने आणि त्यांना व्यासपीठ देण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. नमो उद्यानाप्रमाणेच नगर परिषद क्षेत्रात खेळाच्या मैदानांसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गडकोटांवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. शिवरायांच्या काळातील उपाययोजनांप्रमाणे गडकोटांवर संविधान दिन साजरा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

यावेळी शिंदे यांनी राहुल गांधींवरही टीका केली. विदेशात जाऊन राहुल गांधी भारताची बदनामी करतात, भारताला डेड इकॉनॉमी म्हणतात. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विकासाचं कौतुक केलं आहे. एका सर्वेक्षणानुसार अमेरिका आणि चीननंतर भारत मोठी अर्थव्यवस्था आहे, असं शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >