Tuesday, November 24, 2026

Dev Diwali 2026: देव दिवाळीला किती दिवे लावायचे? 5, 11 की 21....

देव दिवाळीच्या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व आहे. 5,11 की 21, किती दिवे लावणे शुभ मानले जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि दीपदानाची परंपरा.

हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देशभरात देव दिवाळीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदा म्हणजेच 2026 मध्ये आज, 24 नोव्हेंबर रोजी देव दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या पंधरा दिवसांनंतर येणाऱ्या या सणाला 'देवांची दिवाळी' असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान शंकराची पूजा, गंगा स्नान आणि दीपदान करण्याची विशेष परंपरा आहे.

देव दिवाळीच्या दिवशी अनेक भाविक घरात, मंदिरात तसेच नदीच्या घाटांवर दिवे लावून दीपोत्सव साजरा करतात. विशेषतः वाराणसीमधील गंगा घाटांवर लाखो दिव्यांची रोषणाई केली जाते. मात्र, या दिवशी नेमके किती दिवे लावावेत, 5, 11की 21 दिवे लावणे अधिक शुभ मानले जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर जाणून घेऊया यामागील धार्मिक मान्यता.(Dev Deepawali)

देव दिवाळीला किती दिवे लावणे शुभ?

धार्मिक मान्यतेनुसार, देव दिवाळीला दिवे लावण्याची कोणतीही ठरावीक संख्या अनिवार्य नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार दिवे लावू शकते. मात्र, परंपरेनुसार 5, 11, 21, 51 आणि 108 दिवे लावणे शुभ मानले जाते.

  1.  पाच दिवे : पाच दिवे हे पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जातात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्त्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाच दिवे लावण्याची परंपरा आहे. कमी दिवे लावूनही श्रद्धेने दीपदान करू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे.
  2. अकरा दिवे : हिंदू धर्मात 11 या संख्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे. अकरा दिव्यांचा संबंध भगवान शंकराच्या एकादश रुद्र स्वरूपाशी जोडला जातो. त्यामुळे देव दिवाळीच्या दिवशी 11 दिवे लावणे शुभ मानले जाते.(Festival Of Lights)
  3. एकवीस दिवे : 21 दिवे लावणे हीदेखील अनेक घरांमध्ये प्रचलित असलेली धार्मिक परंपरा आहे. सुख, शांती आणि समृद्धीच्या कामनेसाठी भाविक 21 दिवे प्रज्वलित करतात.
  4. एकावन्न दिवे : विशेष पूजा किंवा सामूहिक दीपदानाच्या वेळी 51 दिवे लावण्याची परंपरा काही ठिकाणी पाहायला मिळते. मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे दीपदान केले जाते.
  5. एकशे आठ दिवे : 108 ही संख्या हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. मंत्रजप आणि विशेष धार्मिक विधींमध्ये या संख्येला महत्त्व आहे. त्यामुळे काही भाविक देव दिवाळीला 108 दिवे लावून दीपदान करतात.

देव दिवाळीला घरात कुठे लावावेत दिवे?

देव दिवाळीच्या संध्याकाळी घरातील विविध ठिकाणी दिवे लावण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, पुढील ठिकाणी दिवे लावणे शुभ मानले जाते.

  • देवघरात : घरातील देवघरात भगवान शंकर आणि इतर देवतांसमोर दिवा लावून पूजा करावी.
  • मुख्य दरवाजाजवळ : घराच्या प्रवेशद्वाराजवळ दिवे लावून परिसर उजळवावा.
  • तुळशीजवळ : तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची कार्तिक महिन्यात विशेष परंपरा आहे.
  • अंगणात : अंगणात किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्यांची आकर्षक मांडणी करता येते.
  • मंदिरात : जवळच्या मंदिरात जाऊन श्रद्धेनुसार दीपदान करता येते.

देव दिवाळीला दीपदान करण्याचे महत्त्व काय?

पौराणिक कथेनुसार, त्रिपुरासुर नावाच्या असुराने आपल्या शक्तीच्या जोरावर तिन्ही लोकांमध्ये त्रास निर्माण केला होता. त्याच्या अत्याचारांमुळे देवतांनी भगवान शंकराकडे मदतीची विनंती केली. त्यानंतर भगवान शंकराने कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुराचा वध केला.(Tripurari Purnima)

भगवान शंकराने त्रिपुरासुराचा पराभव केल्यानंतर देवतांनी आनंदोत्सव साजरा केला. या विजयाच्या आनंदात देवतांनी काशीच्या घाटांवर दिवे प्रज्वलित केले, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेचा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी दीपदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख-शांती नांदते. विशेषतः गंगा नदीच्या काठावर दिवे प्रज्वलित करण्याला महत्त्व आहे.

देव दिवाळीला दिवे लावण्याची योग्य वेळ कोणती?

देव दिवाळीच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात दिवे लावणे शुभ मानले जाते. यंदा 24 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा आहे. वाराणसीच्या पंचांगानुसार, संध्याकाळी 5  वाजून 8 मिनिटांपासून ते 7 वाजून 47 मिनिटांपर्यंत प्रदोष काळ आहे. इतर शहरांमधील वेळेत फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या शहरातील स्थानिक पंचांगानुसार दीपदानाची वेळ जाणून घेणे योग्य ठरेल.(Deepdaan)

महत्त्वाची गोष्ट: देव दिवाळीला 5,  11 किंवा 21 दिवे लावण्यापैकी कोणतीही एक संख्या बंधनकारक नाही. श्रद्धा, भक्तिभाव आणि आपल्या कुटुंबातील परंपरेनुसार दिवे लावावेत. दिव्यांची संख्या किती आहे, यापेक्षा भक्तिभावाने केलेले दीपदान अधिक महत्त्वाचे मानले जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >