Tuesday, November 24, 2026

Nashik : पंचवटीत खोदकामादरम्यान पुरातन मंदिरांचा शोध ! नंदी, शिवलिंगासह मंदिरांचे अवशेष आढळले

सिटी सर्व्हे कार्यालयातील डेप्युटी लँड रेकॉर्ड (DLR) विभागाच्या १९१७ सालच्या जुन्या नकाशात या परिसरात एकूण पाच मंदिरांची नोंद असल्याचे दिसून येते. पाताळेश्वर मंदिराच्या पुढील भागातही पुरातन मंदिरे अस्तित्वात असल्याचे या नकाशावरून स्पष्ट होत आहे.

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात सुरू असलेल्या रामकाल पथ विकासकामादरम्यान एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शोध समोर आला आहे. दुतोंड्या मारुती मंदिराच्या मागील बाजूस आणि श्री पाताळेश्वर मंदिराशेजारी सुरू असलेल्या खोदकामात पुरातन मंदिरांचे अवशेष आढळले आहेत. यामध्ये प्राचीन शिवलिंग, नंदी आणि मंदिराचे खांब आढळल्याने परिसरात भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी आणखी दोन प्राचीन मंदिरेही आढळल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या महापालिकेतर्फे या परिसरातील पायऱ्या हटवण्याचे काम सुरू आहे. याच कामादरम्यान जमिनीखाली मंदिरांचे अवशेष आढळून आले. हरिहर भेट आणि सोमवारच्या शुभमुहूर्तावर नंदीसह प्राचीन शिवलिंग समोर आल्याने या शोधाला धार्मिकदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, सिटी सर्व्हे कार्यालयातील डेप्युटी लँड रेकॉर्ड (DLR) विभागाच्या १९१७ सालच्या जुन्या नकाशात या परिसरात एकूण पाच मंदिरांची नोंद असल्याचे दिसून येते. पाताळेश्वर मंदिराच्या पुढील भागातही पुरातन मंदिरे अस्तित्वात असल्याचे या नकाशावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या खोदकामात आणखी ऐतिहासिक अवशेष समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काम थांबवून मंदिरांचे जतन करण्याची मागणी

मंदिरांचे अवशेष निदर्शनास येताच गोदाप्रेमी देवांग जानी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच काँक्रीटीकरणासाठी सुरू असलेले काम थांबवण्यात आले. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन नगराध्यक्षांच्या कार्यकाळात या ठिकाणचे मंदिर उद्ध्वस्त झाले होते. मात्र, आता रामकाल पथ विकासकामाच्या निमित्ताने समोर आलेल्या या अवशेषांचे योग्य पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. विकासकामे करताना प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे नुकसान होऊ नये, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली आहे.

जेसीबीऐवजी मॅन्युअल पद्धतीने खोदकाम करण्याची मागणी

या परिसरात आणखी पुरातन मंदिरे असण्याची शक्यता लक्षात घेता, पुढील खोदकाम अत्यंत काळजीपूर्वक करण्याची मागणी करण्यात आली आहे. नदीपात्रात जेसीबीसारखी मोठी यंत्रसामग्री न उतरवता ब्रेकरच्या सहाय्याने तसेच मानवी श्रमातून (मॅन्युअल पद्धतीने) काम करण्यात यावे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानेही (ASI) यासंदर्भात नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचे आदेश आणि पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार या मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता पंचवटीतील भाविकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >