
नाशिक : शहरातील हॉटेल आणि अन्न आस्थापनांमधील स्वच्छता तसेच अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रशासनाने नाशिकमधील तीन अन्न आस्थापनांवर कारवाई करत दोन आस्थापनांचे अन्न परवाने, तर एका आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. याशिवाय मुंगसरे येथील एका हॉटेलमधून तब्बल ३३ हजार रुपये किमतीची ११० किलो शेव जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड, ज्ञानेश्वर महाले व संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० नोव्हेंबर रोजी शहरातील विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळून आल्यानंतर सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात सुरू असलेल्या रामकाल पथ विकासकामादरम्यान एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शोध समोर आला ...
तीन आस्थापनांमध्ये गंभीर त्रुटी
या कारवाईमध्ये सीबीएस बसस्थानकाजवळील मे. हॉटेल यात्री, मखमलाबाद शिवारातील मे. प्लॅथोपिया एंटरटेनमेंट एलएलपी (फिजी फॉक्स) आणि सीबीएस परिसरातील हॉटेल जनता यांचा समावेश आहे.तपासणीदरम्यान तिन्ही आस्थापनांमध्ये अस्वच्छता आढळून आली. तसेच अन्न सुरक्षा व मानके नियम २०११ मधील अनुसूची चारचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.
हॉटेल यात्रीमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नव्हती. फिजी फॉक्समध्ये अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. त्याचबरोबर काही मुदतबाह्य अन्नपदार्थही सापडले. तर हॉटेल जनतामध्ये तयार अन्नपदार्थ उघड्यावर विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले. या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तिन्ही आस्थापनांवर परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
नाशिक : अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागाने शहरातील चार हॉटेलचे परवाने आणि एका कॅफेचे ...
मुंगसरेतील हॉटेलमधून ११० किलो शेव जप्त
दुसरीकडे, पेरुची वाडी, गट क्रमांक ३७१, मुंगसरे येथील एका हॉटेलमध्येही अन्न प्रशासनाने तपासणी केली. यावेळी शेवच्या पॅकिंगवरील लेबलमध्ये त्रुटी आढळल्या. तसेच शेवचा दर्जा संशयास्पद वाटल्याने प्रशासनाने ३३ हजार रुपये किमतीची एकूण ११० किलो शेव जप्त केली. संबंधित पेढीला सुधारणा नोटीस बजावण्यात आली असून, त्रुटी दूर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड, अश्विनी पाटील, ऋतुजा नवले आणि प्रतीक भड यांनी ही कारवाई केली. दरम्यान, नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा स्वच्छतेबाबत काही तक्रार असल्यास complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.






