
मुंबई : एकल मातांच्या पाल्यांचे शिक्षण कोणत्याही अडचणीमुळे थांबू नये, यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील 1,238 अनुदानित महाविद्यालयांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमीच्या (MSFDC) माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक आणि अकादमीचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.
- ‘शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण धोरण-२०२६’साठी समितीचा अहवाल सादर मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना ...
चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून उपक्रम
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. एकल मातांच्या पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक, सामाजिक आणि भावनिक अडचणींचा सामना करावा लागतो. या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक मदत मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
बागला समितीने सादर केला अहवाल
एकल मातांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेताना कोणत्या सुविधा देता येतील आणि त्यांच्यासाठी कोणत्या कल्याणकारी योजना राबवता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. तसेच राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या एकल मातांच्या पाल्यांची नेमकी संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षणही सुरू आहे.
प्रत्येक महाविद्यालयात एक समुपदेशक
राज्यातील प्रत्येक अनुदानित महाविद्यालयात एका समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे समुपदेशक विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतील, त्यांना योग्य मार्गदर्शन करतील आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व इतर सुविधांवर लक्ष ठेवतील.
दोन टप्प्यांत होणार प्रशिक्षण
समुपदेशकांचे प्रशिक्षण दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठातून तीन मास्टर ट्रेनर्स निवडले जात आहेत. यामध्ये सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि विद्यार्थी कल्याण संचालकांचा समावेश असेल. या मास्टर ट्रेनर्सच्या पहिल्या गटाचे प्रशिक्षण 27 नोव्हेंबर 2026 रोजी MSFDC येथे होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात हे मास्टर ट्रेनर्स विद्यापीठ स्तरावर सर्व 1,238 महाविद्यालयांतील समुपदेशकांना प्रशिक्षण देतील.
एकल मातांच्या पाल्यांचे शिक्षण कोणत्याही अडचणीमुळे थांबू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. बागला समितीच्या शिफारसी आणि सर्वेक्षणातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या विद्यार्थ्यांसाठी ठोस योजना आखण्यात येणार आहेत.






