
जर्मनीतील गेल्सेनकिर्चेन येथील एका 31 वर्षीय महिलेसोबत नेमके हेच घडले. केवळ नाराज असताना मुलांच्या खेळाच्या मैदानातील बाकावर बसल्यामुळे तिला 25 युरो म्हणजे सुमारे 27 डॉलर, किंवा अंदाजे 2,300 रुपये दंड भरावा लागला. या वृत्तामुळे अनेक स्थानिक नागरिक नाराज झाले असून, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपली सारासार बुद्धी कार्यालयातच सोडली होती का, असा जोरदार सवाल उपस्थित केला आहे.
हाना नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महिलेने जर्मन वृत्तपत्र बिल्डला सांगितले की, तिला तिच्या मावशीशी फोन आला होता, तिच्याशी बोलत असताना ती एका बाकावर बसली होती. वैयक्तिक तणावामुळे ती स्वतःला सावरू शकली नाही आणि तेथे रडू लागली. परंतु तिला एकांत मिळण्याऐवजी, अचानक तिच्यासमोर पालिकेचे तीन सार्वजनिक सुव्यवस्था अधिकारी उभे दिसले. त्या अधिकाऱ्यांनी तिला विचारले की समोर खेळत असलेल्या मुलांपैकी कोणी तिचे आहे का? जेव्हा तिने नाही असे सांगितले, तेव्हा त्यांनी तिला सांगितले की मुलांशिवाय प्रौढांना या परिसरात प्रवेश करण्याची परवानगी नाही आणि तात्काळ तिच्या हातात 25 युरो दंडाची पावती दिली. या घटनेमुळे जगभरात याची चर्चा होत आहे.
Your Star Moment: मालिकांमधील पात्रं ही केवळ पडद्यावरची नसतात, तर ती अनेकदा आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. त्यांच्या सुख-दुःखात आपण सहभागी होतो, ...
ती महिला वैयक्तिक आणि आर्थिक समस्यांशी झगडत होती. त्यात तिला 25 युरो, म्हणजेच सुमारे 2300 रुपयांचा दंड ठोठावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या महिलेला रडल्याबद्दल किंवा फोनवर बोलल्याबद्दल नव्हे, तर मुलांच्या खेळण्याच्या जागेत एकही मूल नसताना बसल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. ही घटना जर्मनीतील गेल्सेनकिर्चेन येथील ग्लुकॉफपार्कमध्ये घडली. सदर महिला रसायनशास्त्राचा अभ्यास करत होती आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातही कठीण काळातून जात होती. त्यामुळे, तिने काही वेळ एकटे राहून आराम करण्याचे ठरवले.
हानाच्या म्हणण्यानुसार, तिला त्या क्षणी एकटे राहायचे होते. तिला रडताना कोणीही पाहू नये असे तिला वाटत होते. पण मग, शहराचे तीन अधिकारी तिथे आले जे शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि स्थानिक नियमांवर देखरेख ठेवतात. त्यांनी हानाला विचारले की जवळच झोके घेत असलेली दोन मुले तिची आहेत का? हानाने उत्तर दिले की नाही. त्यावर अधिकाऱ्यांनी तिच्याकडे ओळखपत्र मागितले आणि तिला सांगितले की, मुलांच्या खेळाच्या मैदानात एकही मूल नसताना उपस्थित राहून ती नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यानंतर तिला 25 युरोचा दंड ठोठावण्यात आला.
कोणत्या नियमांतर्गत दंड आकारण्यात आला?
जर्मनीतील गेल्सेनकिर्चेन शहरात, स्थानिक प्रशासनाने मुलांच्या खेळाच्या मैदानांसंदर्भात एक नियम बनवला आहे. ज्यात 14 वर्षांपर्यंतची मुले पालक, पालकत्व स्वीकारलेली व्यक्ती किंवा काळजीवाहकासोबत खेळाच्या मैदानात प्रवेश करू शकतात. परंतु, मुलाशिवाय आलेल्या प्रौढ व्यक्तीला खेळाच्या मैदानात थांबण्याची परवानगी नाही. हा नियम केवळ झोपाळे किंवा इतर खेळण्याच्या साधनांचा वापर करण्यापुरताच नाही, तर बाकांवर बसण्यालाही लागू होतो. याचा अर्थ असा की, जरी एखादी व्यक्ती मुलांसोबत नसली आणि केवळ आराम करण्यासाठी खेळाच्या मैदानातील बाकावर बसली, तरीही तिच्यावर कारवाई होऊ शकते. हानाला याच नियमांतर्गत दंड आकारण्यात आला आहे.
हानाने या कृतीबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे. तिचे म्हणणे आहे की, ती आधीच खूप अस्वस्थ आहे आणि त्यावेळी तिला सहानुभूतीची गरज होती. जेव्हा अधिकाऱ्यांनी तिला रडताना पाहिले, तेव्हा त्यांनी किमान एकदा तरी विचारायला हवे होते की, तिची तब्येत ठीक आहे का किंवा तिला काही मदतीची गरज आहे का? किंवा अधिकाऱ्यांनी तिला नियम समजावून सांगून दुसरीकडे बसायला सांगायला हवे होते. जर त्यांनी तसे केले असते, तर ती सहजपणे तिथून निघून गेली असती. पण तिची परिस्थिती न समजता त्यांनी थेट दंड आकारल्यामुळे तिला खूप वाईट वाटले. त्यावेळी तिला एक माणूस म्हणून स्वतःची काहीच किंमत नाही असे वाटले. मुलांच्या खेळाच्या मैदानांसाठी नियम असावेत पण त्यांची अंमलबजावणी करताना त्यात थोडी माणुसकी असायला हवी. पुढील प्रशासकीय कारवाई किंवा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी तिने दंड भरला.
दरम्यान, शहर प्रशासनाने या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या कृतीचे समर्थन केले आहे . प्रवक्ते मार्टिन शुलमन यांनी 25 युरोचा दंड वाजवी आणि तुलनेने किरकोळ असून तो प्रस्थापित नियमांच्या चौकटीत असल्याचे म्हटले आहे. तसेच शहराच्या नियमांची अंमलबजावणी करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या मते, या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीत अधिकाऱ्यांकडून कोणतेही अयोग्य वर्तन झाल्याचे दिसून आलेले नाही. परंतु, या कारवाईबाबत स्थानिक रहिवासी आणि राजकारण्यांची वेगवेगळी मते आहेत.






