Tuesday, November 24, 2026

ऐकावं ते नवलंच ! चक्क हाडांपासून बनवले कानातले, पुढे नेकलेसही बनवणार ; महिलेची अनोखी कल्पना पाहून नेटकरी थक्क

ऑब्रे यांनी सोशल मीडियावर या अनोख्या कानातल्यांचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे अजूनही हाडांचे काही तुकडे शिल्लक असून त्यापासून नेकलेस तयार करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दागिने म्हटलं की सोनं, चांदी, हिरे आणि मोती हेच डोळ्यांसमोर येतात. पण एखाद्याने स्वतःच्याच शरीरातील हाडांपासून दागिने बनवले तर ? ऐकायला विचित्र वाटत असलं, तरी अमेरिकेतील एका महिलेने असाच अनोखा प्रयोग केला आहे. तिने चक्क स्वतःच्या चेहऱ्याच्या हाडांपासून कानातले तयार करून घेतले आहेत. विशेष म्हणजे, हे कानातले तिने केवळ फॅशन म्हणून बनवलेले नाहीत, तर तिच्या आयुष्यातील एका महत्त्वपूर्ण बदलाची आठवण म्हणून जपले आहेत. या अनोख्या दागिन्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय आहे या अनोख्या दागिन्यांमागचं रहस्य ?

अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या ऑब्रे या 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ट्रान्सजेंडर महिला आहेत. आपल्या आयुष्यातील बदलांच्या प्रवासात त्यांनी चेहऱ्याची फेमिनायझेशन सर्जरी म्हणजेच चेहरा अधिक स्त्रीसदृश दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतली. या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या चेहऱ्याच्या हाडांमध्ये आणि मऊ ऊतींमध्ये काही बदल करण्यात आले. याच शस्त्रक्रियेदरम्यान चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांतून हाडांचे छोटे तुकडे काढण्यात आले होते. साधारणपणे अशा शस्त्रक्रियेत काढलेले हाडांचे तुकडे वैद्यकीय प्रक्रियेनुसार टाकून दिले जातात. मात्र, ऑब्रे यांनी डॉक्टरांकडे हे तुकडे स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी हे तुकडे जपून ठेवले. पुढे याच तुकड्यांपासून काहीतरी खास बनवण्याची कल्पना त्यांच्या मनात आली.

दागिने डिझायनरने दिलं कल्पनेला अनोखं रूप

आपल्या चेहऱ्याच्या हाडांपासून दागिने बनवण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ऑब्रे यांनी रेडिटच्या माध्यमातून एका दागिने डिझायनरशी संपर्क साधला. सुरुवातीला ही कल्पना ऐकायला जितकी वेगळी होती, तितकीच ती प्रत्यक्षात साकार करणंही आव्हानात्मक होतं. मात्र, डिझायनरने त्यांच्या कल्पनेला आकार देत हाडांच्या तुकड्यांपासून खास कानातले तयार केले. आता हे कानातले ऑब्रे यांच्यासाठी केवळ दागिने राहिलेले नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याची आठवण बनले आहेत.

आता हाडांपासून नेकलेस बनवण्याचाही विचार

ऑब्रे यांनी सोशल मीडियावर या अनोख्या कानातल्यांचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे अजूनही हाडांचे काही तुकडे शिल्लक असून त्यापासून नेकलेस तयार करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ऑब्रे यांच्यासाठी हा प्रयोग स्वतःची ओळख स्वीकारण्याशी आणि आत्मविश्वासाने आयुष्यात पुढे जाण्याशी जोडलेला आहे. त्यामुळेच त्यांच्या या कल्पनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कोणासाठी हा दागिना कल्पनेपलीकडचा असू शकतो, तर ऑब्रे यांच्यासाठी तो स्वतःच्या आयुष्याच्या प्रवासाचा एक अनमोल भाग आहे. सोनं-चांदी बाजूला ठेवून स्वतःच्याच शरीरातील हाडांपासून दागिने बनवण्याची ही कल्पना सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >