नवी दिल्ली : संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२ खासदारांसह ४ संसदीय स्थायी समित्यांची ‘संसदरत्न पुरस्कार २०२६’साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ५ खासदारांचा समावेश आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या संसदीय कामगिरीच्या आधारे यंदा १० लोकसभा खासदार आणि २ राज्यसभा खासदारांची निवड करण्यात आली आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्रातून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, भाजपच्या डॉ. मेधा कुलकर्णी, स्मिता वाघ, हेमंत सावरा यांची निवड करण्यात आली. तसेच अन्य खासदारांमध्ये जगदंबिका पाल, पी. पी. चौधरी, निशिकांत दुबे, प्रवीण पटेल, विद्युत महतो, लुबाराम चौधरी, नरहरी अमीन यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. संसद सदस्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ पर्यंतच्या संसदीय कामगिरीच्या आधारे ही निवड करण्यात आल्याचे प्रियदर्शनी राहुल यांनी स्पष्ट केले.
चार संसदीय समित्यांनाही गौरव
यंदा उत्कृष्ट कामगिरीबद्दल ४ संसदीय स्थायी समित्यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालील कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती तसेच अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील कोळसा आणि खाण समितीचा समावेश आहे.
जुलै २०२६ मध्ये नवी दिल्लीत होणार सोहळा
संसदरत्न पुरस्काराची स्थापना २०१० मध्ये चेन्नईस्थित ‘प्राइम पॉइंट फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार केली होती. २०१० मध्ये झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटनही डॉ. कलाम यांनी केले होते. मागील १५ पुरस्कार सोहळ्यांमध्ये खासदार आणि समित्यांना एकूण १४३ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. १६ वा संसदरत्न पुरस्कार सोहळा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे होणार आहे.






