Nashik News : आपलं घर असावं, हसतं खेळतं कुटुंब असावं आणि आपल्या मुलांचा भविष्य उज्ज्वल असावं असं प्रत्येकालाच वाटतं यासाठी आई वडील मोठे कष्ट करतात बऱ्याचदा डबल ड्युटी करतात तर कोणी लेकरांना पाळणाघरात ठेवून काम करत असत. तर काही आई वडील घराला कुलूप लावून मुलांना घरात ठेवून कामासाठी जात असतात. मात्र असं करणं नाशिकच्या एका कुटुंबाला महागात पडलं आहे. आई वडील कामावर असताना घराच्या गॅलरीत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तृप्ती विशाल सोनवणे (वय 8) आणि स्वस्ति विशाल सोनवणे (वय 6) अशी मृत मुलींची नावे आहेत.
आई-वडील क्लिनिकमध्ये गेले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील रासबिहारी मेरी लिंकरोड परिसरातील मानेनगरातील शुभम कॉलनीत ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुभम कॉलनीत डॉ. विशाल सोनवणे हे कुटुंबासह राहत होते. रासबिहारी मेरी लिंकरोडवर (Rasbehari Mary Linkrod) त्यांचे क्लिनिक आहे. त्यांच्या पत्नीही वैद्यकीय व्यवसायात (Medical profession) त्यांना मदत करतात. शनिवारी सायंकाळी सोनवणे दाम्पत्य क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करत होते. त्यावेळी दोन्ही मुली घरी होत्या. रात्री एका रुग्णाला सलाईन लावण्यात आले होते. सलाईन सुरू असल्याने डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिकमध्येच थांबण्यास सांगितले आणि ते घरी गेले.
घराला बाहेरून कुलूप लावले
घरी पोहोचल्यानंतर त्यांनी दोन्ही मुलींना जेवण दिले. त्यानंतर 'आई लगेच घरी येईल', असे सांगून त्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा उघडा ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावून पुन्हा क्लिनिकमध्ये परतले. काही वेळाने रुग्णाची सलाईन संपल्यानंतर डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिक बंद करून घरी जाण्यास सांगितले. पत्नी घरी पोहोचून दरवाजा उघडून आत गेल्या. मात्र, दोन्ही मुली नेहमीप्रमाणे घरात दिसत नसल्याने त्यांना संशय आला. यानंतर त्यांनी घरात आणि परिसरात मुलींचा शोध सुरू केला. गॅलरीतील पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याने टाकीबाबत संशय आल्याने त्यांनी आत डोकावून पाहिले.
दोन चिमुकल्या लेकींचा मृत्यू
त्यावेळी एका मुलीचे केस पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी तातडीने मुलीला टाकीतून बाहेर काढले. त्यानंतर दुसरी मुलगीही त्याच टाकीत असल्याचे त्यांनी पहिले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी दोन्ही मुलींना बाहेर काढल्यानंतर तातडीने पतीला फोन करून घटनेची माहिती दिली. घर आणि क्लिनिकमधील अंतर लक्षात घेता डॉ. सोनवणे यांनी शेजारी राहणारे अमोल पोतदार आणि इतर नागरिकांना मदतीसाठी घटनास्थळी पाठवले. शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलींना रात्री सुमारे 10.35 वाजता अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोन्ही बहिणींना मृत घोषित केले. या घटनेने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






