Wednesday, September 16, 2026

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंकडून मुंबई पोलिसांनी ५० आंदोलकांची माहिती मागवली

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंकडून मुंबई पोलिसांनी ५० आंदोलकांची माहिती मागवली

- परवानगीचा पेच कायम; उच्च न्यायालयात जाण्याच्या हालचाली

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत प्रस्तावित आंदोलनाला अद्याप पोलिसांची परवानगी मिळालेली नसतानाच आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याबाबत हालचालींना वेग आला आहे. आझाद मैदानात आंदोलनासाठी पोलिसांनी ५० आंदोलकांची नावे, संपर्क क्रमांक तसेच ते मुंबईत कोणत्या वाहनातून येणार आहेत, याची माहिती मागवली आहे. ही माहिती जरांगे पाटील यांच्याकडून निश्चित करण्यात येणार असून ती आझाद मैदान पोलीस ठाण्यात सादर केल्यानंतर परवानगीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. (Manoj Jarange Patil)

जरांगे पाटील मंगळवारी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे झाला. दरम्यान, मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी यापूर्वी तीन वेळा परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी मराठा आंदोलनातील नेते उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ सरकारी वकील शिशिर हिरे यांची भेट घेतली. आंदोलनाला परवानगी का नाकारण्यात आली आणि गणेशोत्सवाच्या काळात आंदोलनाला परवानगी देणे का योग्य ठरणार नाही, याबाबतची पोलिसांची भूमिका सरकारी वकिलांना सांगण्यात आली. प्रकरण न्यायालयात गेल्यास पोलिसांकडून आपली बाजू मांडली जाणार असून त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. (Manoj Jarange Patil)

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या काळात मुंबई तसेच पुणे शहरातील पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यताही आहे. त्यामुळे गणेशोत्सव संपल्यानंतर आंदोलनास परवानगी देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील वर्षीच्या आंदोलनात अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, त्याच पार्श्वभूमीवर यंदा परवानगीबाबत सावध भूमिका घेतली जात असल्याचे वृत्त आहे. (Manoj Jarange Patil)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >