Wednesday, October 14, 2026

'फ्लेक्समुक्त मुंबई' अभियानासाठी महापौरांची धडाकेबाज सुरुवात, घाटकोपरमध्येच अनधिकृत बॅनर हटवत केला मोहिमेचा श्रीगणेशा

मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांच्या प्रभागापासून अनधिकृत बॅनर हटवून मोहिमेची धडक सुरुवात केली आहे.

मुंबई: मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनरचे प्रमाण वाढले आहे. चौका- चौकात आणि प्रत्येक ठिकाणी बॅनरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या महापौरांनी त्यांच्या प्रभागापासूनच अनधिकृत बॅनर हटवून मोहिमेची धडक सुरुवात केली आहे. नगरसेविका म्हणून रितू तावडे ह्या घाटकोपर पूर्वेतून निवडून आल्या आहेत. मुंबईतील अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी महापौरांनी 'शाडू बाप्पा दहा दिवस- फ्लेक्समुक्त मुंबई तीनशे पासष्ट दिवस' ही विशेष मोहिम नुकतीच घोषित केली. या मोहिमेत विरोधकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.

या अनुषंगाने, मोहिमेची सुरुवात महापौर रितू तावडे यांनी आज (14 ऑक्टोबर 2026- बुधवार) सकाळी स्वतःच्याच नगरसेवक प्रभागातून थेट रस्त्यावर उतरून केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील घाटकोपर पूर्वेतील गजबजलेल्या झुलेलाल चौक (विक्रांत सर्कल) आणि गारोडिया नगर परिसरात लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स आणि पोस्टर्स महापौर रितू तावडे यांनी स्वतः काढले. यावेळी परिसरातील सर्व अनधिकृत फलक तत्काळ हटविण्यात आले. शिवाय, नव्याने अनधिकृत फलक लावले जाणार नाहीत, यासाठी देखरेख करण्याची सूचनाही महापौरांनी केली. मोहिमेदरम्यान अनुज्ञापन विभाग, परिरक्षण विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच संबंधित खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

स्वत:च्या कृतीतून महापौरांनी मुंबईतील लोकप्रतिनिधींसमोर नवा वस्तुपाठ ठेवला आहे. मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढे येऊन नेतृत्व केले, तर प्रशासनाचे काम आणखी सुलभ होते, याचा प्रत्यय मुंबईच्या महापौरांनी बीएमसीतल्या सर्व नगरसेवकांना दिला आहे. महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटवण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांनाही मोठी गती मिळाली आहे. मुंबईला प्लास्टिक, फ्लेक्स तसेच अनधिकृत बॅनरच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला पत्र लिहून 'झिरो टॉलरन्स' धोरण राबविण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. या मोहिमेला व्यापक स्वरूप मिळावे आणि राजकीय दुष्मनी विसरून सर्वांनी एकत्र यावे, यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना व नेत्यांना पत्र पाठवित आहेत.

अधिकृत फलकांसाठी क्यूआर कोड प्रणाली अनिवार्य करणे, विनापरवाना फलक छापणाऱ्या मुद्रकांना आणि एजन्सींना काळ्या यादीत टाकणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे कमाल 72 तासांत निवारण करणे, अशा सक्त उपाययोजनांची आखणी या धोरणात करण्यात येत आहे. मोहिमेविषयी बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, "ज्याप्रमाणे मुंबईकरांनी श्रीगणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य देऊन पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवला, त्याचप्रमाणे वर्षभर मुंबईला प्लास्टिक आणि फ्लेक्सच्या कचऱ्यापासून मुक्त ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे व लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. मुंबईचे देखणेपण आणि शिस्त राखण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, संस्था आणि नागरिक यांनी आपापल्या परिसरात अशाच प्रकारे पुढाकार घेऊन या मोहिमेचे अनुकरण करावे.", असे आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे. स्वतःच्या प्रभागातून सुरुवात करत महापौरांनी दाखवलेल्या या पर्यावरणपूरक भूमिकेचे मुंबईकरांकडून स्वागत होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >