Tuesday, November 24, 2026

Godavari Pollution: गोदावरी प्रदूषणप्रकरणी 199 अधिकारी न्यायालयाच्या रडारवर

मुख्य सचिवांकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र; नाशिक महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीतील अधिकाऱ्यांचा समावेश

मुंबई : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात 199 अधिकाऱ्यांची नावे सादर केली आहेत. पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली. नाशिक महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) विविध पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा या यादीत समावेश आहे.(Godavari River)

न्यायालयात सादर केलेल्या यादीत 2012 पासून नाशिक महापालिकेत कार्यरत असलेले सर्व आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि गोदावरी संवर्धन कक्षाच्या उपायुक्तांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 2009 पासूनचे जॉइंट डायरेक्टर, प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नावेही देण्यात आली आहेत. याशिवाय एमआयडीसीच्या संबंधित प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकाऱ्यांचाही या यादीत समावेश आहे.(Save Godavari)

दरम्यान, अंबड आणि सातपूर येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (सीईटीपी) काम 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर तीन महिने चाचणी घेऊन फेब्रुवारीअखेर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात देण्यात आली. मात्र, अंबड-सातपूर परिसरासाठी नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी दोन तृतीयांश निधी एमआयडीसीने आणि एक तृतीयांश निधी नाशिक महापालिकेने द्यावा, असे निर्देश मुख्य सचिवांनी 4 नोव्हेंबर 2026 रोजी दिले होते. मात्र, एमआयडीसीने निधी देण्यास नकार देत तसे लेखी कळवले आहे.(Clean Godavari)

तात्पुरती उपाययोजना म्हणून नंदिनी नदीचे पाणी गोदावरीला मिळण्यापूर्वी अगरटाकळी येथील एसटीपीकडे वळवण्यात येत असल्याची माहिती नाशिक महापालिकेने लेखी स्वरूपात दिली आहे. मात्र, पावसाळ्यात आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नंदिनी नदीचे पाणी अशा प्रकारे वळवणे शक्य होणार नाही, असा मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.(Godavari Pollution)

नदीचे पाणी मानवी वापरासाठी अयोग्य असून आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट करणारे मोठे फलक नदी परिसरात तातडीने लावावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. तसेच नंदिनी-गोदावरी संगम घाट, दसक घाट आणि ओढा घाट येथे नदीच्या पाण्याचा वापर, स्नान आणि आचमन करण्यास तातडीने बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. गोदावरी प्रदूषणप्रकरणी पुढील सुनावणी 11 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे.(Court Action)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >