Ahilyanagar : कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ५ हजार ७०४ कोटी ५० लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, कुकडी प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा डिंभे-माणिकडोह सुमारे १६ किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याच्या प्रकल्पालाही राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला डिंभे-माणिकडोह बोगद्याचा प्रश्न मार्गी लागल्याने दक्षिण अहिल्यानगरच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी सांगितले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्या कार्यकाळात या प्रश्नाला गती मिळाली. तर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगण्यात येत आहे.
डिंभेचे अतिरिक्त पाणी माणिकडोहला वळवणार
डिंभे आणि माणिकडोह ही कुकडी धरणमालिकेतील महत्त्वाची धरणे आहेत. माणिकडोह धरणाची क्षमता सुमारे १०.५ टीएमसी असून, स्थानिक पावसाच्या पाण्यावर हे धरण अपेक्षित प्रमाणात भरत नाही. दुसरीकडे, डिंभे धरण आणि त्याखालील घोड धरण भरल्यानंतर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी खालच्या भागाकडे वाहून जाते. हेच अतिरिक्त पाणी आता सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे डिंभे धरणातून माणिकडोह धरणात वळविण्याची योजना आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा अधिक प्रभावी वापर करता येणार असून, माणिकडोह धरणाची साठवण क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्यास मदत होणार आहे. माणिकडोह धरणातील पाण्याचा मुख्य उपयोग कुकडी डावा कालवा आणि त्याखालील लाभक्षेत्रातील शेतीसाठी केला जाणार असल्याने या प्रकल्पाचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
Jalgaon Crime : अपहरण करून गुंगीचे औषध पाजल्याचा, बेशुद्धावस्थेत आळंदी येथे विवाह लावल्याचा आणि पुण्यात अत्याचार केल्याचा आरोप करत एका तरुणासह त्याच्या ...
तीन जिल्ह्यांतील शेतीला मोठा फायदा
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला ५,७०४.५० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेला मोठे बळ मिळणार आहे. या माध्यमातून १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. याचा लाभ पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे. कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत, तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला नियमित पाण्याचा आधार मिळाल्यास पीक पद्धतीत बदल होण्यासोबतच शेती उत्पादन वाढण्याची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण
या निर्णयाबाबत डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, दक्षिण नगर भागातील शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता डिंभे–माणिकडोह बोगद्याचा निर्णय झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न भाजप आणि आपणच मार्गी लावू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे ते आश्वासन प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले. कुकडी प्रकल्पाला मिळालेली सुधारित प्रशासकीय मंजुरी आणि डिंभे–माणिकडोह बोगद्याला मिळालेली मान्यता यामुळे दक्षिण अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील सिंचन व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.





