Jalgaon : यंदाच्या खरीप हंगामात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने कपाशीचं मोठं नुकसान झालं. आता उरलेल्या पिकाला पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने कपाशीवर ‘लाल्या’च्या समस्येने डोकं वर काढलं आहे. पात्या आणि बोंडधारणेच्या महत्त्वाच्या अवस्थेत असलेल्या कपाशी पिकावर लाल्यासह विविध रोग आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात कपाशीचं क्षेत्र साडेचार लाख हेक्टरने घटलं
यंदा विविध कारणांमुळे राज्यातील कपाशीची लागवड सरासरीच्या तुलनेत तब्बल साडेचार लाख हेक्टरने कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही सरासरीच्या तुलनेत जवळपास सव्वालाख हेक्टरने कपाशीचं क्षेत्र घटलं आहे. त्यातच जुलै अखेर झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात तब्बल ३५ हजार हेक्टरवरील कपाशीचं नुकसान झालं. उरलेल्या पिकातून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असतानाच आता पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे.
सध्या कपाशीचं पीक पात्या लागण्यापासून बोंड परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. याच काळात पिकाला पुरेसा पाऊस किंवा पाणी न मिळाल्याने पिकावर ताण निर्माण झाला आहे. यामुळे लाल्या, नैसर्गिक गळ, आकस्मिक मर, दहिया आणि करपा यांसारख्या समस्या वाढत आहेत. तसंच रसशोषक किडींचा प्रादुर्भावही वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील स्पर्धा परीक्षेच्या अकादमीमध्ये ...
‘लाल्या’ म्हणजे नेमकं काय?
कृषी तज्ज्ञांच्या मते, कपाशीवरील ‘लाल्या हा रोग नसून एक विकृती आहे. विशेषतः अमेरिकन संकरित बीटी वाणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
यामध्ये कपाशीची पानं लालसर, जांभळट किंवा तांबूस होतात. काही वेळा पानांच्या कडा लाल होतात, पाने आकसतात आणि पिकाची वाढ मंदावते. पिकावर पाण्याचा ताण येणे, त्यानंतर अचानक पाणी मिळणे, तापमानातील चढ-उतार आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव यामुळे ही समस्या वाढू शकते.
महत्त्वाचं म्हणजे पानं लाल झाली म्हणून थेट बुरशीनाशकांची फवारणी करण्याऐवजी पिकाची मुळांची स्थिती, जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता तपासणं गरजेचं आहे. जमिनीत नत्र आणि मॅग्नेशियमसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असमतोल असल्यासही पानांमध्ये लालसरपणा दिसू शकतो. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर आणि रसशोषक किडींचं वेळेवर नियंत्रण करणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
जळगाव येथील कापूस संशोधन केंद्राने पिकाची सुरुवातीपासूनच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एक सरी आड पाणी देण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा कपाशीचं कमी क्षेत्र, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि आता पावसाचा खंड यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘लाल्या’च्या संकटातून कपाशीचं पीक कसं वाचवायचं, याचं मोठं आव्हान आता शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे