Wednesday, September 9, 2026

Jalgaon Crime : २०० रुपयांची लाच भोवली ! जामनेरचा लाचखोर भूकरमापक दुसऱ्यांदा जाळ्यात

Jalgaon Crime : २०० रुपयांची लाच भोवली ! जामनेरचा लाचखोर भूकरमापक दुसऱ्यांदा जाळ्यात

Jalgaon Crime : एका घटनेनंतर धडा घेईल अशी अपेक्षा असताना जामनेरचा लाचखोर भूकरमापक १४ वर्षानंतर पुन्हा जाळ्यात अडकला आहे. भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकाला पुन्हा एकदा लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक असलेले पत्रक आणि टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी ७०० रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर २०० रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. अवघ्या २०० रुपयांसाठी भिकारी झालेल्या भूकरमापकाची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.

भगवान रोहिदास गायकवाड (५१, रा. भुसावळ), असे एसीबीकडून कारवाई करण्यात आलेल्या भूकरमापकाचे नाव आहे. मंगळवारी जामनेर येथील भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या लाचखोर भूकरमापकाने ६५ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याकडून लाच मागितल्याने माणुसकी संपल्याचे या घटनेतून दिसून आले.

नेमकं प्रकरण काय ?

जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रूक येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याला त्यांच्या शेतीची मोजणी करायची होती. त्यासाठी आवश्यक असलेले स्कीम पत्रक आणि टिपण उतारा मिळविण्यासाठी त्यांनी २ सप्टेंबर रोजी जामनेर येथील भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला. संबंधित कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी येथे असलेले भूकरमापक भगवान गायकवाड यांनी संधी साधत तक्रारदाराकडे ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली.

२०० रुपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात

तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली. यावेळी गायकवाड याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ७०० रुपयांऐवजी २०० रुपये स्वीकारण्यास त्यांनी संमती दर्शविल्याचे एसीबीच्या कारवाईत समोर आले. त्यानंतर लाच स्वीकारण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून २०० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने भूकरमापक भगवान गायकवाड यांना रंगेहाथ ताब्यात घेतलेअसून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

१४ वर्षांपूर्वीही लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा

भगवान गायकवाड यांच्याविरुद्ध यापूर्वी २०१२ मध्ये भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या घटनेनंतर तब्बल १४ वर्षांनी ते पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे जामनेर भूमिअभिलेख कार्यालयात खळबळ उडालीय. या सापळा कारवाईत पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर होते. हवालदार बाळू मराठे, प्रणेश ठाकूर आणि सचिन चाटे यांच्यासह पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाई यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >