Nashik : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी-सोनांबे-शिवडे-पांढुर्ली-विंचूर दळवीमार्गे भगूर रस्ता आणि बोरखिंड येथे नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या इंटरचेंजच्या कामाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी ३४३ कोटी ९९ लाख रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, बोरखिंड इंटरचेंज सुरू झाल्यानंतर नाशिक ते मुंबई हे अंतर सुमारे २२ किलोमीटरने कमी होणार आहे.
समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी सध्या तीन पर्याय
नाशिककरांना सध्या समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांना इगतपुरी जोडणीमार्गे सुमारे ४५ किलोमीटर, तर भरवीर खुर्द जोडणीमार्गे सुमारे ४४ किलोमीटर अंतर पार करावं लागतं. सिन्नर तालुक्यातील तिसरा पर्याय नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी नाशिकपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे.
दुहेरी टोलच्या भुर्दंडातून सुटका होण्याची शक्यता
इगतपुरी जोडणीमार्गे नाशिक ते मुंबई हे अंतर सुमारे १९४ किलोमीटर आहे. मात्र, या मार्गावर वाहनधारकांना घोटी टोल प्लाझावर टोल द्यावा लागतो. त्यानंतर समृद्धी महामार्गासाठी स्वतंत्र टोल आकारला जातो. भरवीर खुर्द जोडणीपर्यंत जाण्यासाठी ग्रामीण भागातील अरुंद रस्त्याचा वापर करावा लागतो. या मार्गाने मुंबईचे अंतर सुमारे २१५ किलोमीटर असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आलं आहे. नव्या बोरखिंड इंटरचेंजमुळे समृद्धी महामार्गावर जाण्या-येण्यासाठीचं अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना वेळेची बचत होण्यासोबतच दुहेरी टोलच्या भुर्दंडातूनही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
UP Crime News : लग्नानंतर नववधूसोबत सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या वराला धक्कादायक फसवणुकीचा सामना करावा लागलाय. उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये लग्न ...
कुंभमेळ्यात भाविकांच्या वाहतुकीला मोठी मदत
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर डुबेरे–सोनारी परिसरातून भगूर आणि समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी उपलब्ध झाल्यास भाविकांच्या वाहनांची वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
रस्त्यासोबत आठ पूल आणि सात भुयारी मार्ग
प्रस्तावित प्रकल्पात मातीकाम, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण आणि काँक्रीट रस्त्याची कामं करण्यात येणार आहेत. याशिवाय
आठ पूल उभारण्यात येणार आहेत.
सात भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत.
संरक्षक भिंती आणि वृक्षलागवड केली जाणार आहे.
पेव्हर ब्लॉक आणि बसथांब्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याने, निविदा प्रक्रियेबाबतची आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.