Ashish Shelar : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकडे कूच करू नका!

- मंत्री आशिष शेलार यांचे मनोज जरांगे यांना आवाहन; चर्चेतून प्रश्न सोडवूया


मुंबई : गणेशोत्सव आणि गौरी उत्सवाच्या काळात राज्यभरातील, विशेषतः मुंबई-पुण्यातील गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या सणांच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास, अडचण अथवा असुविधा होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.


मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांवर आतापर्यंत अनेक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुर्वीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने निर्णय घेतले नाही ते आमच्या सरकारने घेतले आहे. त्यामुळे आंदोलनाऐवजी चर्चेच्या माध्यमातून उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी सरकार तयार आहे, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. (Ashish Shelar)



मराठा समाजाच्या १४ मागण्यांपैकी १३ मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार सकारात्मकपणे चर्चा करत आहे. मंत्रिमंडळ गटाच्या माध्यमातून याबाबत काम सुरू आहे. त्यामुळे हिंदू सणासुदीच्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढविण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. (Ashish Shelar)


मराठा समाजासाठी विशेष कायदा, एसईबीसी संदर्भातील निर्णय, ईडब्ल्यूएस अंतर्गत संधी, नोंदणी व प्रमाणपत्र प्रक्रियेबाबतचे निर्णय, शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण, न्यायालयीन प्रक्रिया, निवड होऊनही नियुक्ती न झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे संरक्षण, जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुलभ करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुलभ करण्याचे निर्णय, आयोगाची स्थापना तसेच न्यायालयात सरकारची भूमिका मांडणे आणि ती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे, अशी विविध कामे महायुती सरकारने केली आहेत, असे शेलार यांनी सांगितले. (Ashish Shelar)



मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता यांसह विविध बाबींमध्ये ओबीसी समाजाप्रमाणेच सुविधा देण्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ गटाच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विषयावर काम सुरू असून, उर्वरित अडचणीही दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. “मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण माहिती आणि अहवाल उपलब्ध आहे. त्यामुळे मराठा समाजाने वस्तुस्थिती लक्षात घ्यावी,” असे आवाहन शेलार यांनी केले. (Ashish Shelar)


मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील सरकारविरोधी वक्तव्यांबाबतही शेलार यांनी नाराजी व्यक्त केली. “आपली भूमिका मांडण्याचा आणि आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वापरली जाणारी अपमानास्पद भाषा मान्य करता येणार नाही. मतभेद असू शकतात; मात्र व्यक्तींचा अपमान करणारी भाषा योग्य नाही,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “ज्या मागण्यांवर निर्णय झाले आहेत, ज्या बाबी न्यायालयीन प्रक्रियेत टिकविण्यासाठी सरकारने व्यवस्था उभी केली आहे आणि ज्या विषयांवर मंत्रिमंडळ गट चर्चा करत आहे, त्या पार्श्वभूमीवर टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. आंदोलनाच्या मार्गाने प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होऊ नयेत, याची काळजी सर्वांनी घ्यावी.” (Ashish Shelar)



मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबतही शेलार यांनी चिंता व्यक्त केली. “मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांच्या तब्येतीची आम्हालाही काळजी आहे. आपल्या मागण्यांसाठी सकारात्मक मार्गाने चर्चा करावी. मात्र गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणांच्या काळात मुंबई-पुण्यासह राज्यातील नागरिक आणि गणेशभक्तांना त्रास होईल, अशी कोणतीही भूमिका घेऊ नये,” असे शेलार यांनी सांगितले.


“चर्चेचे दरवाजे सरकारने बंद केलेले नाहीत. मराठा समाजाच्या उर्वरित प्रश्नांवरही चर्चा करून मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढविण्याऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी,” असे आवाहन ॲड. आशिष शेलार यांनी केले. (Ashish Shelar)

Comments
Add Comment

Nitin Nabin : नितीन नबीन यांनी घेतले सिद्धिविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन

- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिला मुंबई दौरा; कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात स्वागत मुंबई :

Sangli Crime News : 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, न्यायालयाने दया दाखवलीच नाही ! कारण...

Sangli Crime News : विहिरीत सापडलेला मृतदेह, घरात लपवलेला पुरावा आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, सांगली

Tukaram Mundhe : ११ रुपयांच्या सलाईन नळीची ३२५ रुपयांना विक्री, तुकाराम मुंढेंचे केंद्राला पत्र; ‘ट्रेड प्राइज’ आणि ‘एमआरपी’तील फरकावर नियमनाची शिफारस

मुंबई : रुग्णालयांमध्ये उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या किमती आणि त्यावर छापलेल्या कमाल

Lalbaugcha Raja Crowd : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांग; भाविकांना धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल!

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेक भावि

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात - १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमची भेट घेतल्याचा विश्व हिंदू परिषदेचा दावा

मुंबई : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात १९९३ च्या

मराठा-कुणबी नोंदी शोधणाऱ्या शिंदे समितीला मंत्रालयात कार्यालय - फडणवीस सरकारचा निर्णय; मराठा आरक्षण कक्षाचे कामकाजही याच ठिकाणाहून चालणार

मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा-कुणबी नोंदींचा शोध आणि आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन कामकाज अधिक