Wednesday, September 16, 2026

Kanpur Crime News : औषध व्यावसायिकाच्या हत्येचा तपास मुलापर्यंत पोहोचला, 309 कॉल्स आणि 6 संशयास्पद फोन

Kanpur Crime News : औषध व्यावसायिकाच्या हत्येचा तपास मुलापर्यंत पोहोचला, 309 कॉल्स आणि 6 संशयास्पद फोन

Kanpur Crime News : कानपूरमधील प्रसिद्ध औषध व्यावसायिक विनीत मनोचा (६०) यांच्या हत्येच्या तपासात दररोज नवे धागेदोरे समोर येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात विनीत यांच्या सुनेला शालू, कथित शूटर विशाल गौतम आणि त्याचा साथीदार राज किशोर यांना अटक झाली आहे. मात्र, आता तपासाची दिशा विनीत यांचा मुलगा सुब्रत याच्याकडेही वळली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांमुळे सुब्रत आणि आरोपी विशाल यांच्यातील संपर्क तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. (Vineet Manocha Murder Case)

हत्येच्या दोन दिवस आधी नवीन सिमकार्ड

पोलीस आयुक्त रघुबीर लाल आणि पोलीस उपायुक्त (पश्चिम) एस.एम. कासिम अबिदी यांच्या माहितीनुसार, कथित शूटर विशाल गौतमने ३ सप्टेंबरला नवीन सिमकार्ड घेतले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, ५ सप्टेंबरच्या पहाटे विनीत मनोचा यांची घरात घुसून चाकूने हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, या नव्या नंबरवरून विशालने शालूसोबतच सुब्रत यालाही सहा वेळा फोन केल्याचे तपासात समोर आले आहे. हत्येपूर्वी घेतलेल्या या नवीन नंबरवरून सुब्रतशी नेमका कशासाठी संपर्क झाला होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सुब्रत-विशालमध्ये ३०९ वेळा संपर्क

तपासातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे १ मे ते ५ सप्टेंबर या कालावधीत सुब्रत आणि विशाल यांच्यात तब्बल ३०९ वेळा फोनवर संभाषण झाल्याची माहिती कॉल डिटेल्स रेकॉर्डमधून समोर आली आहे. पोलिसांकडे या प्रकरणाशी संबंधित सुमारे १,००० पानांचे CDR असल्याचे सांगण्यात आले आहे. विशाल हा पूर्वी विनीत मनोचा यांच्या कंपनीत काम करत होता. चोरीच्या आरोपावरून त्याला नोकरीवरून काढण्यात आले होते. मात्र, नोकरी गेल्यानंतरही त्याचा सुब्रतशी सातत्याने संपर्क असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले आहे. या प्रकरणात शालूने हत्येचा कट रचल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. दुसरीकडे, पोलिसांच्या माहितीनुसार, विशालने विनीत मनोचा यांची हत्या शालूच्या सांगण्यावरून केल्याचा दावा केला आहे. विशालच्या म्हणण्यानुसार, हत्येच्या बदल्यात शालूने त्याला ६ लाख रुपये आणि नोकरीचे आमिष दाखवले होते. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे बाकी आहे.  (Vineet Manocha Murder Case)

संपत्ती आणि कर्जाचाही तपास

पोलिसांकडून विनीत मनोचा यांच्या संपत्तीशी संबंधित बाबींचाही तपास केला जात आहे. २०२२च्या मृत्यूपत्रानुसार, बिरहाना रोड आणि कॅनाल रोड, कानपूर तसेच गाझियाबाद येथील संपत्तीचे वाटप पत्नी पुनीता, मुलगा सुब्रत आणि मुलगी शुभानी यांच्या नावावर करण्यात आले होते. याशिवाय, सुब्रतवर ऑनलाइन क्रेडिट आणि इतर माध्यमातून मोठी देणी असल्याचे पुरावे तपास यंत्रणेला मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि हत्येमागील संभाव्य कारणांचा संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. आता पोलिसांकडून आरोपींची कस्टडी रिमांड घेण्याची तयारी सुरू असून, शालू, विशाल आणि सुब्रत यांना आमनेसामने बसवून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. ५ सप्टेंबरच्या पहाटे घरात घुसून झालेल्या विनीत मनोचा यांच्या हत्येच्या तपासात कॉल रेकॉर्ड, तांत्रिक पुरावे, संपत्तीचे व्यवहार आणि आरोपींचे जबाब यावरून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >