Wednesday, September 16, 2026

Disha Salian Case : सतीश सालियन यांच्या वतीने आदित्य ठाकरेंच्या दाव्यांवर गंभीर आक्षेप; कायदेशीर लढा तीव्र

Disha Salian Case : सतीश सालियन यांच्या वतीने आदित्य ठाकरेंच्या दाव्यांवर गंभीर आक्षेप; कायदेशीर लढा तीव्र

मुंबई : दिवंगत दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात शिवसेनेचे (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशावरील कथित अत्याचार, हत्या आणि त्यानंतरच्या ‘कव्हर-अप’ प्रकरणावरून राजकीय व कायदेशीर वर्तुळात खळबळ उडाली आहे.(Disha Salian Case)

आदित्य ठाकरेंचे दावे प्रथमदर्शनी खोटे आणि दिशाभूल करणारे

दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही आणि आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित व बदनामीकारक आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकात केला होता. मात्र, हे दावे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचा पलटवार सतीश सालियन यांच्या वतीने करण्यात आला आहे. सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी सीबीआय चौकशीला आणि एफआयआर नोंदवण्यास तीव्र विरोध केला होता, मात्र उच्च न्यायालयाने २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशाद्वारे त्यांचे सर्व आक्षेप फेटाळून लावले, असा मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.(Disha Salian Case)

न्यालयात खोटे विधान केल्याचा आरोप

आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी उच्च न्यायालयासमोर शपथेवर असे खोटे विधान केले होते की, हे प्रकरण आधीच सर्वोच्च न्यायालयात गेले असून सीबीआयने त्याचा तपास केला आहे, त्यामुळे उच्च न्यायालय यावर सुनावणी करू शकत नाही. मात्र, न्यायालयाने पडताळणी केल्यावर हे विधान असत्य असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयासमोर माफी मागितली होती, असा दावाही यात करण्यात आला आहे. तसेच रिया चक्रवर्तीला ओळखत नसल्याचा त्यांचा दावा एनसीबीच्या (NCB) चॅट्समुळे खोटा ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे.(Disha Salian Case)

मोबाइल टॉवर लोकेशन आणि ड्रग्स तस्करीचे गंभीर आरोप

आदित्य ठाकरेंच्या गुन्हेगारी कारवायांशी संबंधित सर्व भौतिक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन असल्याच्या मुद्द्यावर किंवा एनसीबीच्या गुन्हा क्रमांक १५/२०२० मधील अहवालावर त्यांनी कधीही स्पष्ट इन्कार केलेला नाही. यामध्ये ते अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असल्याचा आणि हायड्रोपोनिक वीडचे सेवन करत असल्याचा संशय व्यक्त करणाऱ्या फोन सर्व्हेलन्स रेकॉर्डचा समावेश आहे. तसेच, दिशाच्या मृत्यूच्या दिवशी (८ जून २०२०) आपण मुंबईबाहेर असल्याचे त्यांचे म्हणणे होते, कारण त्यांचे आजोबा पाटणकर यांचे निधन झाले होते; मात्र प्रत्यक्षात पाटणकर १४ जून २०२० पर्यंत जिवंत असल्याचा दावा करत हा युक्तिवाद देखील खोडून काढण्यात आला आहे.(Disha Salian Case)

माध्यमांच्या सहभागावर आणि तपासावर ताशेरे

माध्यमांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळेच हे प्रकरण पुन्हा उघडू शकल्याचे सांगत, माध्यमांमधील चर्चेवर घेतलेला आक्षेप दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले आहे. खरी भीती ‘माध्यमांचा हस्तक्षेप’ नसून, प्रत्येक घडामोडीवर सार्वजनिकरीत्या होणारी कठोर छाननी आणि विचारले जाणारे प्रश्न यामुळे दोषींना शिक्षेपासून बचाव करणे कठीण होईल, अशी भीती आदित्य ठाकरेंना वाटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी यापूर्वी वकील चैतन्य राऊत यांच्यामार्फत पाठवलेल्या मानहानीच्या नोटिशीलाही अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही. जनतेकडून होणारी ही निष्पक्ष छाननी तपास भरकटविण्याचे प्रयत्न अधिक कठीण बनवेल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.(Disha Salian Case)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >