मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीचा फटका बसलेल्या 265 तालुक्यांतील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून आगामी परीक्षेसाठी शुल्क घेण्यात येणार नाही. फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षांसाठी ही सवलत लागू करण्यात आली आहे.
महाज्योतीसाठी ३०० कोटींचा निधी मुंबई : इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या सर्वांगीण विकासासह विद्यार्थ्याना सुविधा पुरवण्यासाठी महसूलसह सर्व शासकीय ...
मदत आणि पुनर्वसन विभागाने 25 सप्टेंबर 2026 रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.
या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व विभागीय मंडळांना सूचना दिल्या आहेत. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता त्यांची ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत ही कार्यवाही शुल्काशिवाय करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळावा यासाठी संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तातडीने माहिती देण्याच्या सूचना विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाणार नाही याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, परीक्षा शुल्क माफीबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रांबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.