Friday, October 2, 2026

Smit Machchhar : विमानातील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी साधला संवाद

Smit Machchhar : विमानातील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी साधला संवाद

मुंबई : फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्यात जखमी झालेले भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी संकटाच्या प्रसंगी दाखवलेल्या धैर्याबद्दल मच्छर यांचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. विमान हवेत असताना सहवैमानिकाने कॅप्टन मच्छर यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात मच्छर गंभीर जखमी झाले. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.

विमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉकपिटमध्ये पोहोचणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर मच्छर यांनी प्रयत्न करून कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर विमानातील प्रवासी आणि क्रू सदस्यांनी हल्लेखोराला नियंत्रणात आणल्याचे सांगण्यात आले. पुढे विमानाचे सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादादरम्यान मच्छर भावूक झाले. या प्रसंगात त्यांना मानसिक आधार देणाऱ्या गोष्टींबाबत बोलताना त्यांनी संकटाच्या वेळी हनुमान चालिसेचे पठण केल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी त्यांच्या धैर्याचे कौतुक करत देशातील नागरिक त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले.

मच्छर यांनी या घटनेतील थरारक प्रसंगही पंतप्रधानांना सांगितला. गंभीर दुखापत झाल्यानंतरही विमान खाली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कॉकपिटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामुळे पुढील परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेनंतर कॅप्टन मच्छर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, विमानातील हल्ल्याच्या घटनेची संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेतील इतर बाबी तपासल्यानंतर स्पष्ट होणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >