Friday, October 2, 2026

Dr. Mohan Bhagwat: धर्म आणि राष्ट्र परस्परावलंबी, जगातील आव्हानांवर भारताच्या ज्ञानपरंपरेत मार्ग

Dr. Mohan Bhagwat: धर्म आणि राष्ट्र परस्परावलंबी, जगातील आव्हानांवर भारताच्या ज्ञानपरंपरेत मार्ग

मुंबई: “राष्ट्राचा उद्देश धर्म आहे आणि धर्मच राष्ट्राला टिकवून ठेवतो. धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून आहेत. एकाचे अस्तित्व असेल तरच दुसऱ्याचे अस्तित्व टिकू शकते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी केले. बोरीवली येथे ‘ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप’च्या 14 व्या परिषदेत ते जैन तरुणांसह उपस्थितांना संबोधित करत होते. जग विविध विरोधाभास, संघर्ष आणि टोकाच्या विचारसरणींमुळे अनेक आव्हानांना सामोरे जात असताना त्यावर मार्ग दाखविण्याची क्षमता भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेत असल्याचेही भागवत यांनी सांगितले.

जगासमोर सध्या विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण, व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि कौटुंबिक जीवन यांच्यात समतोल साधण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत मानवतेला दिशा देण्याची क्षमता भारताच्या ज्ञानपरंपरेत असल्याने जग भारताकडे आशेने पाहत असल्याचे भागवत यांनी नमूद केले. भारताने आपल्या ज्ञानाचा प्रसार अन्य देशांवर आक्रमण करून किंवा सक्तीने धर्मपरिवर्तन घडवून केला नाही, असे भागवत म्हणाले. मानवकल्याणाच्या निःस्वार्थ भावनेतून भारताने आपले ज्ञान जगासमोर मांडले. हीच भारताच्या ज्ञानपरंपरेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांसह जैन आगम, त्रिपिटक आणि गुरुग्रंथ साहिब यांसारख्या ग्रंथांमध्ये मानवतेला दिशा देणारे व्यापक ज्ञान सामावलेले आहे. संतांच्या शिकवणुकीतूनही मानवकल्याण, समरसता आणि सेवाभावाचा संदेश मिळतो. या ज्ञानसंपदेची आज जगाला आवश्यकता असल्याचे भागवत यांनी सांगितले. भारताच्या या ज्ञानपरंपरेचे संरक्षण करणे आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही केवळ धार्मिक जबाबदारी नाही, तर संपूर्ण मानवतेप्रती असलेले कर्तव्य आहे, असेही भागवत यांनी प्रतिपादन केले. संतपरंपरा आणि सेवाभावी वृत्तीचे जतन म्हणजे मानवी समाजाच्या सुरक्षित आणि कल्याणकारी भविष्याचे जतन असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पद्मभूषण आचार्य श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरि महाराज यांनीही उपस्थितांना संबोधित केले. “देशाची संस्कृती संपली तर देश संपायला वेळ लागत नाही. त्यामुळे देशाची संस्कृती वाचवणे आणि तिचे जतन करणे गरजेचे आहे. हे केवळ आपल्या संस्कारांमुळे शक्य होईल. राष्ट्र वाचले तर धर्म वाचेल आणि धर्म वाचला तर आपण सुरक्षित राहू,” असे ते म्हणाले. राष्ट्रसुरक्षा आणि संस्कृती रक्षणासाठी आपण संघासोबत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ‘ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप’कडून देशभरात पायी प्रवास करणाऱ्या जैन साधूंचा प्रवास सुरक्षित आणि अपघातविरहित होण्यासाठी मदत केली जाते. या सेवाकार्यातील योगदान आणि संतपरंपरेच्या जतनाचा मुद्दाही परिषदेत अधोरेखित करण्यात आला. आचार्य श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरि महाराज यांनी आतापर्यंत 500 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘आनंद यात्रा- अठराह कर्तव्य’ या 536 व्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या प्रसंगी आचार्य महाबोधी सूरीश्वरजी यांच्यासह इतर आचार्य आणि मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >