Saturday, October 3, 2026

Abhijeet Dipke: विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी अभिजित दीपकेसह 500 जणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Dipke: विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी अभिजित दीपकेसह 500 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई: दादर येथील शिवाजी पार्क परिसरात पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पक्षाचा (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके याच्यासह सुमारे 500 आंदोलकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत 2 ऑक्टोबरला करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलन केल्याने संबंधितांवर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने 2 ऑक्टोबरला सायंकाळी 4 ते 7 या वेळेत शिवाजी पार्क मैदानात आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, शिवाजी पार्क परिसर शांतता क्षेत्र तसेच रहिवासी भाग असल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलनाला पूर्वपरवानगी नाकारली होती. असे असतानाही शेकडो आंदोलक परिसरात जमले आणि सार्वजनिक रस्त्यावर सभा घेतल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आंदोलनादरम्यान लाऊडस्पीकरचा वापर करून घोषणाबाजी करण्यात आली तसेच सार्वजनिक ठिकाणी जमाव करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिजित दीपके, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका, सौरभ दास, आफरीन नवाज, सोम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मळगी आणि योगेश इंगळे यांच्यासह सुमारे 500 अज्ञात आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(2) (बेकायदेशीर जमाव), 223 (सरकारी आदेशाचे उल्लंघन) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37(1), 37(3) आणि 135 अन्वये कारवाई केली आहे. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन आणि प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केल्याच्या बाबींचाही तपास केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >