अहमदाबाद : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahemdabad Bullet Train) प्रकल्पाच्या कामाला वेगाने गती मिळत असून, या प्रकल्पाच्या वाटेतील एक मोठा टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील प्रसिद्ध साबरमती नदीवर ४८० मीटर लांबीचा आणि तब्बल ३६ मीटर उंचीचा अवाढव्य पूल बांधून पूर्ण झाला आहे. हा पूल साधारण १२ मजली इमारतीइतका उंच असून, या कॉरिडॉरमधील मुख्य आणि आव्हानात्मक बांधकामांपैकी एक मानला जात आहे.
रेल्वे मार्गांच्या वरून मार्ग काढण्यासाठी खास रचना
हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-दिल्ली मुख्य रेल्वे मार्गाच्या अगदी जवळ आहे. जमिनीपासून सुमारे १४.८ मीटर उंचीवर असलेल्या या पुलाची रचना अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे. साबरमती आणि अहमदाबाद या दोन महत्त्वाच्या बुलेट ट्रेन स्टेशनच्या मध्ये हा पूल येतो. (साबरमती स्टेशनपासून १ किमी तर अहमदाबाद स्टेशनपासून ४ किमी अंतरावर). खाली असलेल्या सध्याच्या रेल्वे मार्गांना आणि इतर पायाभूत सुविधांना कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून या पुलाचे खांब (पिलर्स) जास्त उंच ठेवण्यात आले आहेत.
मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ...
नदीच्या प्रवाहाला धक्का न लावता ८ विशाल खांबांचा आधार
NHSRCL च्या माहितीनुसार, या भव्य पुलाचे वजन पेलण्यासाठी एकूण ८ गोलाकार खांब उभारण्यात आले आहेत. प्रवाहात कमीत कमी अडथळा यावा यासाठी खांबांची मांडणी रणनीतिकदृष्ट्या करण्यात आली आहे. यातील ४ खांब थेट नदीच्या पात्रात, २ खांब नदीच्या दोन्ही तीरांवर, तर उरलेले २ खांब नदीच्या किनाऱ्याबाहेर उभारले गेले आहेत. यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून नक्षीदार अन् भक्कम बांधकाम
नदीतील पाण्याचा प्रवाह आणि खोली लक्षात घेता, या पुलाच्या उभारणीसाठी 'बॅलॅन्स्ड कँटिलीव्हर पद्धत' (Balanced Cantilever Method) वापरण्यात आली आहे. खोल नद्या आणि मोठ्या जलमार्गांवर लांब पूल बांधण्यासाठी हे एक प्रगत तंत्रज्ञान मानले जाते. या तंत्रज्ञानामुळे पुलाच्या खाली तात्पुरते मोठे सांगाडे किंवा मचान उभारण्याची गरज पडत नाही, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि खालील वाहतूक अडवली जात नाही.
नद्यांवरील २५ पैकी १८ पुलांचे काम पूर्ण
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) मार्ग हा अनेक उड्डाणपूल, महामार्ग, रेल्वे लाईन आणि मेट्रो कॉरिडॉरवरून जातो. त्यामुळे संपूर्ण प्रवासात एकूण २५ मोठे नदी पूल बांधले जाणार आहेत. त्यापैकी तब्बल १८ पुलांचे काम आतापर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, उर्वरित कामेही वेगाने सुरू आहेत.






