Sunday, October 4, 2026

Mumbai Stray Dogs : आता एकदा पकडून नेल्यानंतर श्वानाला पुन्हा तिथेच सोडणार नाही

Mumbai Stray Dogs : आता एकदा पकडून नेल्यानंतर श्वानाला पुन्हा तिथेच सोडणार नाही

प्रत्येक श्वानाच्या देखभालीवर दिवसा केला जाणार १५५ रुपये खर्च

कायमस्वरुपी देखभाल आणि काळजी घेण्यासाठी संस्थेची निवड

वर्षाला श्वानांच्या देखभालीवर होणार सुमारे साडेपाच कोटींचा खर्च

मुंबई ( सचिन धानजी) : भटक्या श्वानांसाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी निवारा केंद्र निर्माण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु श्वानांना निर्बिजीकरणासाठी नेल्यानंतर पुन्हा तिथेच आणून सोडले जाते. परंतु आता भविष्यात एकदा पकडून नेलेल्या श्वानाला पुन्हा तिथे आणून सोडता त्यांची काळजी कायम निवारा केंद्रात घेतली जाणार आहे. यासाठी सुरक्षित निवारा, उपचार, आहार, लसीकरण व आयुष्यभर देखरेखीची व्यवस्था करण्यासाठी खासगी संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासाठी प्रति श्वान, प्रति दिन अन्न पुरवण्यासाठी व देखभाल करण्यासाठी १५५ रुपये खर्च केले जाणार असून वर्षाला साडेपाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. भटक्या श्वानांची योग्य काळजी निवारा केंद्रांमध्ये घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया मान्यताप्राप्त जेनिस स्मिथ ऍनिमल वेलफेअर ट्रस्ट या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने भटक्या श्वानांच्या निवारा व्यवस्थापन व आयुष्यभर काळजी यासाठी ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया मान्यताप्राप्त एनजीओ संस्थांकडून स्वारस्य अर्ज मागवले होते. त्याद्वारे या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या जेनिस स्मिथ ऍनिमल वेलफेअर ट्रस्ट यासंस्थेची दोन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी १३.३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबईतील शैक्षणिक संस्था, रुग्णालये (सार्वजनिक /खाजगी), क्रिडा संकुल, बस स्टेंड / डेपो (आंतरराज्य बस टर्मिनलसह) किंवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात आढळणा-या प्रत्येक भटक्या श्वानांना ताबडतोब पकडून त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरणानंतर नियुक्त केलेल्या निवा-यांमध्ये हलविण्याची जबाबदारी निश्चित केली आहे, तसेच श्वानांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत

महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभाग व पशुसंवर्धन विभाग यांचे परिपत्रकानुसार महानगरपालिकांनी भटक्या श्वानांसाठी श्यान निवारे तयार करण्याची सूचना व गाईडलाईन्स निर्गमित केलेल्या आहेत. त्यामध्ये श्वानांची सुरक्षित पकड करुन त्यांची नसबंदी (Sterilization) व लसीकरण करुन त्यांना योग्य निवारा आणि आहार, पाणी, उपचार व आयुष्यभर संगोपन (Lifetime Care) करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या नियुक्त संस्थेने सदर श्वानांना निवारा केंद्रात दाखल करून त्यांची नोंदणी, खाद्यपुरवठा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय उपचार, लसीकरण, आवश्यक देखभाल व निवारा व्यवस्थापन ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार करणे बंधनकारक राहील. या श्वानांना मूळ संवेदनशील परिसरात पुन्हा सोडण्यात येणार नाही,असे स्पष्ट केले आहे.

भटक्या श्वानांची आयुष्यभर काळजी ,निवारा व्यवस्थापन

श्वानांना सुरक्षित निवारा देणे, नियमित आहार पुरविणे, स्वच्छता व देखभाल करणे, तसेच आवश्यकतेनुसार उपचार व दस्तऐवजीकरण राखणे ही सर्व जबाबदाऱ्या नियुक्त केलेल्या एनजीओ संस्थेने पार पाडावयाच्या आहेत. सर्व कामांचे जीपीएस आधारित नोंदीकरण, फोटो लॉगिंग, आणि महानगरपालिकेच्या निर्दिष्ट मोबाइल ऍप, डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे नियमित रिपोर्टिंग बंधनकारक असेल. या संस्थेकडे पाचगणी येथे श्वान निवारा केंद्र उपलब्ध असून, वसई, विरार, सफाळे व कल्याण-डोंबिवली येथे ऍनिमल बर्थ कंट्रोल केंद्र कार्यरत असल्याने संस्थेला संबंधित क्षेत्रातील अनुभव व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >