पनवेलकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेल - कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आले असून काही दिवसांतच प्रवास अधिक सुखकर होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) प्रमुख उपनगरीय रेल्वे प्रकल्पांमधील अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. पनवेल कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वेच्या कामात झालेली प्रगती हा विकासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची वाट पाहणाऱ्या पनवेलकरांची आणि रायगडवासियांची प्रतीक्षा अखेर काही महिन्यांत थांबणार आहे.
पनवेल रेल्वे स्थानक आणि परिसरात या नव्या उपनगरीय मार्गासाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक कामांना वेग आला असून रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार युद्धपातळीवर काम करताना दिसत आहेत. नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत चालवण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात स्वतंत्र प्लॅटफॉर्मची उभारणी करण्यात आली आहे. येथे प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, नवीन रेल्वे रुळांची जोडणी, अद्ययावत सिग्नल यंत्रणा तसेच ओव्हरहेड वायर आणि इतर तांत्रिक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत आहेत.
मुंबई : विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. ...
सध्या पनवेल, नवीन पनवेल, नेरे, चिखली, चौक आणि कर्जत या भागात जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतुकीवर किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, हा उपनगरीय रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांना एका सक्षम आणि जलद पर्यायाची जोड मिळणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधन आणि पैशांचीही मोठी बचत होणार आहे. या मार्गाची एकूण लांबी ही २९.६ किलोमीटर असून या मार्गात पनवेल, चिखले, पोसरी, चौक आणि कर्जत ही प्रस्तावित स्थानके आहेत.
रेल्वे स्थानकात सुरु असलेले काम पाहून हा मार्ग कधी चालू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) आणि मध्य रेल्वेकडून सर्व चाचण्या आणि कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे नियोजन सुरु आहे. प्रकल्पाची प्रगती पाहता या मार्गाचे लोकार्पण लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे. आता प्रत्यक्ष लोकल धावण्याची अधिकृत तारीख कधी जाहीर होते याकडे संपूर्ण रायगड आणि पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.






