Friday, October 9, 2026

गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्याने बाधित होणारी 180 बांधकामे एस विभागाने हटवली

मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून वाहतुकीवरचा भार कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्याने बाधित होणारी 180 बांधकामे हटविण्याची कारवाई महापालिकेच्या एस विभागाच्या वतीने करण्यात आली.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून वाहतुकीवरचा भार कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणा-या गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्याने बाधित होणारी १८० बांधकामे हटविण्याची कारवाई महापालिकेच्या एस विभागाच्या वतीने ९ ऑक्‍टोबर २०२६ रोजी करण्यात आली. खिंडीपाडा सोनापूर या टप्प्यात ही कारवाई करण्यात आली. त्‍यामुळे एस विभागाच्या हद्दीतील गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.

गोरेगाव - मुलुंड जोड रस्त्याची लांबी १२.२० किलोमीटर आहे. या जोडरस्त्याचे काम चार टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात रस्ता, भूमिगत बोगदा, उड्डाणपूल आदी कामाचा समावेश आहे. एस विभागाच्या हद्दीतील खिंडीपाडा सोनापूर येथील सुमारे १८० बांधकामे जोडमार्गाच्या उभारणीमुळे बाधित होणार होती. या बांधकामांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे.

उप आयुक्त (परिमंडळ ६) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एस विभागाच्‍या सहायक आयुक्त यांच्‍या नेतृत्‍वाखाली ही मोहीम राबविण्‍यात आली. महानगरपालिकेचे ३० पेक्षा अधिक अभियंते, १०० कर्मचारी यांच्या सोबत ४ पोकलेन संयंत्र, ४ जेसीबी संयंत्र, १० डंपर आदींच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. ९० पोलीस कर्मचारी यावेळी तैनात होते.

महापालिका एस विभागाच्या हद्दीतील गोरेगाव - मुलुंड जोड रस्त्याने बाधित होणारी जवळपास सर्वच बांधकामे आता हटवण्यात आली आहे. यामुळे गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्याच्या रूंदीकरणाला सुरूवात करणे शक्य होईल. सर्व निर्धारित अडथळे दूर करून रस्ता रुंदीकरण व प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी मार्ग मोकळा करण्‍यात आला आहे. अतिक्रमणांचे निष्कासन पूर्ण झाले असून, सध्या बांधकामाचा राडारोडा हटविण्याचे काम सुरू आहे. राडारोडा हटविल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी जागा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. प्रकल्‍पबाधितांपैकी पात्र १०८ रहिवाशांचे महानगरपालिकेच्‍या वतीने पुनर्वसन करण्‍यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >