Friday, October 9, 2026

विनोद कांबळीला बघा...तीन वर्षानंतर बोलू...! माजी क्रिकेटपटू कपिल देव वैभव सूर्यवंशीबाबत काय म्हणाले?

भारतीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीच्या नावाचा डंका वाजत आहे. कमी वयातच त्याने क्रिकेटमधील अनेक पल्ले गाठले आहेत. पण असं असताना दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांचं विधान चर्चेत आलं आहे. विनोद कांबळीचं उदाहरण देत त्यांनी आपलं म्हणणं मांडलं.

वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव.. कमी वयात आणि अल्पावधीतच त्याने नावलौकीक मिळवला. आयपीएल स्पर्धा ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा डंका आहे. कारण त्याने अवघ्या 15व्या वर्षी क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे त्याच्याभोवती स्टारडमचं वलय आलं आहे. असं असताना दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी स्पष्ट केलं की, फक्त टॅलेंटच्या जोरावर करिअर टिकवता येणं शक्य नाही. याबाबत सांगताना त्यांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचं उदाहरण दिलं. एका वृत्तपत्राशी बोलताना कपिल देव म्हणाले की, वैभवच्या कामगिरीबाबत काही शंका नाही. पण क्रिकेटविश्वात असे अनेक खेळाडू पडले आहेत आणि होते. त्यांच्यात जबरदस्त क्षमता होती आणि असं असूनही त्यांना त्याची ओळख कायम ठेवता आली नाही. कपिल देव यांनी पुढे सांगितलं की, त्याच्यात काय क्षमता आहे हे आता सांगणं घाईचं ठरेल. पण क्रिकेटमध्ये आजवर असे बरेच खेळाडू येऊन गेले. त्यांच्यात खूप टॅलेंट होतं आणि नंतर विस्मरणात गेले. कपिल देव यांनी पुढे सांगितलं की, विनोद कांबळी बघा. त्याच्याबाबत आम्ही काय बोलणार?

राहणीमान बदललं की विचारही बदलणार..

कपिल देव यांनी वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत बोलताना सांगितलं की, कमी वयातच मिळाली प्रसिद्धीत एक तरूण खेळाडू स्वत:ला कसं सावरतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. वय आणि जीवनशैलीतील बदलामुळे विचार बदलू शकतात. कपिल देव म्हणाले की, वैभव सूर्यवंशी हा 15 वर्षांचा आहे. त्याला आणखी तीन वर्षे द्या. मग आपण बोलू.. कपिल देव यांनी पुढे सांगितलं की, 'जेव्हा त्याचं राहणीमान बदलेल, तेव्हा त्याचे विचारही बदलतील. मग पुढच्या दोन वर्षात कसा वागतो हे आपल्याला कळेल. त्याची कामगिरी पाहण्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे.'

वैभव सूर्यवंशीचा क्रिकेटमधील चढता आलेख

वैभव सूर्यवंशीला मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने बोली लावून आपल्या संघात घेतलं होतं. अवघ्या 13 व्या वर्षी त्याच्यासाठी बोली लागल्याने चर्चा रंगली. त्यानंतर आयपीएल 2025 मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. या पर्वात त्याने आपल्या आक्रमक शैलीने भल्याभल्या गोलंदाजांना फोडून काढलं. इतकंच काय तर हा फॉर्म आयपीएल 2026 मध्ये कायम राहिला. 776 धावा करून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतही त्याची बॅट चांगलीच तळपली. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध झंझावाती खेळी केली. वैभवने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवला. पण काही खास करू शकला नाही. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात संधी मिळाली आणि त्याचं सोनं केलं. एशियन्स गेम्स स्पर्धेत खेळला आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >