Sunday, November 8, 2026

Western Express Accident: अंधेरीत हिट अँड रन! भरधाव कारची दुचाकीला धडक; बँकर जोडपे जखमी, चालक फरार

अंधेरी पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बहार जंक्शनजवळ शुक्रवारी सकाळी मोटारसायकल आणि कारच्या अपघाताची घटना घडली. या अपघातात बीकेसी येथे बँकेत काम करणारे एक जोडपे जखमी झाले. भरधाव वेगात असणाऱ्या चारचाकी गाडीने त्यांच्या मोटारसायकलला मागून धडक दिली. यानंतर कारचालक तेथून फरार झाला. या घटनेत २९ वर्षीय सर्वेश प्रभू यांच्या दोन्ही तळहातांना आणि उजव्या गुडघ्याला दुखापत झाली तर त्यांची पत्नी ३१ वर्षीय अदिती हिचे उजवे मनगट फ्रॅक्चर झाले. प्रभू त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, एक काळ्या रंगाची कार भरधाव वेगाने आली आणि त्यांच्या मोटारसायकलला धडकली, ज्यामुळे ते दोघेही खाली फेकले गेले आणि बाईकचेही नुकसान झाले.

अंधेरी पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताच्या अवघ्या १५ मिनिटे आधी हे जोडपे त्यांच्या कांदिवली येथील घरातून निघाले होते. चालक न थांबता पळून गेला आणि त्या जोडप्याला फक्त गाडीचा रंगच दिसला. त्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले.

अंधेरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार निष्काळजीपणे आणि धोकादायकपणे वाहन चालवल्याप्रकरणी एका अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वाहनाची ओळख पटवण्यासाठी आणि चालकाचा शोध घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून आरटीओकडून नोंदी मागवल्या आहेत. अपघातानंतर वाहनचालकाने कोणता मार्ग वापरला हे निश्चित करण्यासाठी अधिकारी फुटेजची तपासणी करत आहेत, असे अंधेरी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >