Saturday, November 14, 2026

Nashik : येवला तालुक्यात आगीचे तांडव ! दोन गावांत 35 ट्रॉली चारा जळून खाक, एक जण गंभीर जखमी

नाशिक : येवला तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांमध्ये चाऱ्याला आग लागल्याच्या घटना घडल्या असून, या दुर्घटनांमध्ये तब्बल ३५ ट्रॉली चारा जळून खाक झाला आहे. गुरुवारी (दि. १२) रात्री घडलेल्या या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, आडसुरेगाव येथे आग विझविण्याचा प्रयत्न करताना एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनांमुळे परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कुसूर येथे शॉर्टसर्किटमुळे २५ ट्रॉली चारा जळाला

पहिली घटना कुसूर येथे गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. येथील शेतकरी दौलत गायकवाड यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी मका आणि बाजरीचा सुमारे २५ ट्रॉली चारा खरेदी करून साठवून ठेवला होता. मात्र, अचानक शॉर्टसर्किट झाल्याने साठवलेल्या चाऱ्याला आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण चारा जळून खाक झाला. मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून साठवलेला चारा डोळ्यांसमोर जळताना पाहून शेतकरी गायकवाड यांना मोठा धक्का बसला.

आडसुरेगावमध्ये १० ट्रॉली मका चारा आगीत खाक; एक जण जखमी

दुसरी घटना आडसुरेगाव येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. येथील शेतकरी सुनील पोपटराव चव्हाण यांचा सुमारे १० ट्रॉली मका चारा अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला. चाऱ्याला आग लागल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि संपूर्ण चारा जळून नष्ट झाला. यावेळी आग विझविण्याचा प्रयत्न करताना किशोर चव्हाण हे गंभीररीत्या जखमी झाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >